आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठांची बॅडमिंटन; 286 खेळाडूंचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्हा व्हेटरन्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे शुक्रवारी स्टेडियममध्ये उद्घाटन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉ.जगदीश पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसीय व्हेटरन्स (ज्येष्ठ) बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात महाराष्ट्रातून 286 खेळाडू सहभागी झाले असून स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण होणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी बॅडमिंटन प्रशिक्षक अविनाश दामले, अतुल देशपांडे, किशोर शिंगे, बाहशाह सैयद, दीपक आर्डे यांचा क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. टर्की येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या जळगाव असोसिएशनच्या संघातील खेळाडू डॉ.वृशाली पाटील, चेतना शाह, रमा सिंह, सुचेता चित्रे आणि सुनील रोकडे यांनाही स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व व्हेटरन्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील, महानगराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, कल्याणेहोळच्या सरपंच कल्पिता पाटील, युगल जैन, ज्योती पाटील, डॉ. नूतन पाटील, डॉ.के.डी.पाटील, संतोष सोनवणे, सतिष देशमुख, डॉ.जे.बी.राजपूत, हिरेन वेद, डॉ.तुषार उपाध्याय उपस्थित होते. मोनिका मिलवाणी यांनी सूत्रसंचालन केले.

उदयोन्मुखांना प्रेरणा
स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू वयाने जरी ज्येष्ठ असले तरी मनाने हे सर्व खेळाडू चिरतरुण आहेत. बॅडमिंटन हा डॉक्टरांचा आवडता खेळ आहे. ज्येष्ठ खेळाडूंचा खेळ पाहून उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी सांगितले.

म्हणूनच निर्णय घेतला
तरुण खेळाडूंना सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळते. मात्र, वयस्कर (व्हेटरन्स) खेळाडूंच्या बाबतीत नेहमीच याउलट स्थिती असते. म्हणून व्हेटरन्स बॅडमिंटन असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शासन आणि प्रशासन यांची सांगड घालत राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. पालकमंत्री संजय सावकारे, आमदार राजीव देशमुख, आमदार जगदीश वळवी यांच्या मदतीतून राज्यस्तरीय स्पर्धेचे शिवधनुष्य पेलले. महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनच्या परवानगीनंतर महिनाभर आयोजनाची तयारी केली, असे जिल्हा व्हेटरन्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ.अस्मिता पाटील यांनी सांगितले.

अशा वयोगटात विभागणी
तीन दिवसीय चालणार्‍या स्पर्धेसाठी खेळाडूंचे 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55, 55 ते 60 आणि 60 ते 65 असे वयोगट करण्यात आले आहेत. या गटांमध्ये एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी प्रकारात सामने होत आहेत. स्पर्धेत जवळपास 50 महिलांचाही सहभाग असणार आहे. शुक्रवारी 136 फेर्‍या पार पडल्या.

एकाचवेळी सर्व महिला खेळाडू
शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता उपलब्ध सर्व बॅडमिंटन कोर्टवर एकाचवेळी सर्व महिला स्पर्धकांचे सामने रंगले. प्रत्येक वयोगटात सहभागी ज्येष्ठ महिला खेळाडूंचा उत्साह युवकांनाही लाजवणारा होता. हातात रॅकेट घेऊन मैदानात उतरलेल्या या खेळाडूंना पाहून महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात पुढे असल्याचा प्रत्यय आला.

ह्युबर्ट मिरांडा यांचाही सहभाग
स्पर्धेसाठी एकूण दहा पंच काम पाहत आहेत. 2009 (स्पेन) आणि 2011 मध्ये कॅनडा येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारे 65 वर्षीय बॅडमिंटनपटू ह्युबर्ट मिरांडा यांनीदेखील स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या खेळातून अनेक उदयोन्मुख खेळाडूंना बॅटमिंटनचे धडे घेण्याची संधी उपलब्ध झाली आहेत.

छंदामुळे वाढते जीवनाची गोडी, बॅडमिंटनपटू ह्युबर्ट मिरांडा यांची माहिती
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीने छंद जोपासल्यास जीवनाची गोडी वाढते. त्यामुळे आपणही बॅडमिंटन खेळाचा छंद जोपासला आहे. बॅडमिंटनमुळे योग्य व्यायाम मिळत असल्याने वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही, असे मत 65 वर्षीय बॅडमिंटनपटू ह्युबर्ट मिरांडा यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना व्यक्त केले.

वडील रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते. त्यामुळे मुंबईतील बँकेच्या क्वार्टरमध्ये आमचा निवास होता. मुंबईत आमच्या घराजवळच अंडरग्राउंड बॅडमिंटन कोर्ट होते. तिथे नंदू नाटेकर यांच्यासारखे मोठे खेळाडू सरावासाठी येत असत. त्यांचा सराव मी खिडकीतून न्याहाळत असे. त्यामुळे मलाही बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. 1962 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षांपासून बॅडमिंटन खेळण्यास सुरवात केली. तेव्हापासून सुरू झालेला बॅडमिंटन खेळाचा प्रवास आजतागायत सुरू असल्याचे मिरांडा म्हणाले.

पुणे विद्यापीठात बी.ए. पूर्ण केल्यावर रिझर्व्ह बँकेत नोकरी लागली. सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 अशी कामाची वेळ होती. ऑफिसहून आल्यावर मी सरावाला प्राधान्य देत असे. बॅडमिंटनमध्ये खरे यश वयाच्या चाळीशीनंतर मिळाले. गेल्या 11 वर्षांपासून शिरीष नाडकर्णी माझा जोडीदार आहे. त्याच्याशिवाय मी दुहेरी प्रकार खेळत नाही. आतापर्यंत त्याच्यावर 17 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीदेखील त्याचा उत्साह नेहमी पहिल्या स्पर्धेप्रमाणेच असतो, असेही त्यांनी सांगितले.

आतापर्यंत स्पेन, कॅनडा, मलेशिया, युके, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशात स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या विश्वचषक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतातील 110 जणांची टीम गेली होती. मात्र, त्या स्पर्धेत फक्त एकमेव सुवर्णपदक जिंकल्याची आठवण आजही ताजी आहे. थायलंडचा चायसक थाँग देज स्री हा जगातील क्रमांक एकचा बॅटमिंटनपटू आहे. त्याच्यासोबत दोन वेळा झालेल्या लढतीत मी त्याचा पराभव केल्याचेही मिरांडा यांनी सांगितले.

फिटनेसचे रहस्य उलगडताना मिरांडा म्हणाले की, रोज सकाळी आणि संध्याकाळी दीड तास सराव, अडीच तास कोचिंग हेच फिटनेसचे रहस्य आहे. खेळाप्रती प्रेम जोपासताना शिस्त आवश्यक आहे. योग्य फूट वर्क यशाची पहिली पायरी असल्याचेही ते म्हणाले.