आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र कृषी विद्यापीठ धुळे शहरातच व्हावे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी स्थापन झालेल्या विभाजन समितीच्या प्रत्येक जिल्ह्यात बैठका होत आहेत. नव्याने निर्माण होणार्‍या स्वतंत्र कृषी विद्यापीठासाठी धुळे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या योग्य असून, जिल्ह्यात विविध सोयी-सुविधा असल्याने हे विद्यापीठ धुळे जिल्ह्यात व्हावे, अशी मागणी आमदार प्रा. शरद पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार प्रा. शरद पाटील यांनी नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अग्रगण्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात आहे. विद्यापीठाची स्थापना होऊन 50 वर्षे झाली. या 10 जिल्ह्यांत हवामान व पीक पद्धतीनुसार विविध पिकांचे संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय आहेत. कराड, नंदुरबार येथे नुकतेच पदवी महाविद्यालय सुरू झाले आहे. हवामानात बदल होत असून, जमिनीची सुपीकता कमी झाल्याने पीक पद्धतीत बदल झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नव्या विद्यापीठाची स्थापना होणार आहे. त्यानुसार खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करावे. या विद्यापीठाचे मुख्यालय धुळयात करावे हा मुद्दा आमदार प्रा. पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर चर्चेवेळी उपस्थित केला. विद्यापीठाच्या स्थापनेमुळे नवीन पदांची भरती होईल. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय सुरू होतील. जिल्ह्यात असलेली जमीन, अन्य सुविधा, महामार्गामुळे उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या सुविधा, मनमाड-इंदौर रेल्वे मार्ग, तापीवरील जलप्रकल्प आदी सोईचा विचार करता खान्देशसाठीचे स्वतंत्र कृषी विद्यापीठ हे शहरात व्हावे येथे करण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रा. पाटील यांनी केली. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

कापूस संशोधन केंद्र व्हावे
खान्देशात कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे जिल्ह्यात संशोधन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. खान्देशात केळी, कडधान्यासह दुय्यम पिकेही घेतली जातात. त्यामुळे प्रक्रिया उद्योगासंदर्भात खान्देशात संशोधनाला संधी आहे.

नियंत्रण अडचणीचे
राहुरी कृषी विद्यापीठाचा विस्तार मोठा असल्याने सर्वच जिल्ह्यात देखरेख ठेवणे, कारभारावर नियंत्रण ठेवणे कुलगुरूंसह प्रशासनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे खान्देशसाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास निश्चितपणे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर संशोधनाला चालना मिळणार असल्याचा मुद्दा आमदार पाटील यांनी चर्चेवेळी मांडला.

दिव्य मराठीचा पुढाकार
विद्यापीठ विभाजन समितीने शहरात भेट दिली. त्या दिवशी ‘दिव्य मराठी’ने विभाजनाबाबत वृत्त प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेतली. विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य आमदार प्रा.शरद पाटील, आमदार अनिल गोटे यांनी विद्यापीठ शहरात करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची भूमिका मांडली होती.

समिती सदस्यांनाही निवेदन
खान्देशसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ धुळे येथे व्हावे या मागणीचे निवेदन आमदार प्रा. शरद पाटील यांच्याकडून विद्यापीठ विभाजन उच्चस्तरीय समितीतील सदस्य डॉ. वाय.एस. पी. थोरात, डॉ. एस. एस. पुरी, डॉ. शंकरराव मगर, डॉ. सी. डी. मायी, डॉ. एस. एस. कदम, उमाकांत दांगट, डॉ.उत्तमराव कदम आदींनाही देण्यात आले आहे. त्यासंदर्भात आमदारांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. तरच विद्यापीठ होणे शक्य होईल अन्यथा ते दुसरीकडे जाऊ शकते.