आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे दंगलीच्या चौकशीसाठी कक्ष स्थापन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - शहरातील माधवपुरा भागात 6 जानेवारी रोजी दंगल झाली होती. याप्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील जुने अधिष्ठाता कार्यालयात कक्ष सुरू करण्यात आला आहे. चौकशीसंदर्भात आयोगाने विविध नियम केले आहेत. या नियमांच्या अधीन राहून चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. नियमावलीची सूची शासनाने प्रसिद्ध केली आहे.

माधवपुरा परिसरात झालेल्या दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दंगलीची सीआयडी चौकशी सुरू आहे. शिवाय न्यायालयीन चौकशीसाठी आयोगाची स्थापना झाली आहे. या आयोगाचे सचिव अ. र. याडकीकर यांनी चौकशीसंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्यानुसार शासकीय सुट्या वगळता सोमवार ते शुक्रवार सकाळी अकरा ते दुपारी दीड व सव्वादोन ते साडेचार या वेळेत चौकशी होणार आहे. आयोगाच्या सचिवांना समन्स, नोटीस व पत्रव्यवहार यावर स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आले आहेत.

चौकशी कक्षात येणार्‍या प्रत्येकाने मोबाइल बंद ठेवणे बंधनकारक असेल. चौकशीच्या वेळी वकील व साक्षीदाराला हजर ठेवण्याची जबाबदारी संबंधिताची असेल. साक्षीदाराची उलटतपासणी ही चौकशी मुद्दय़ाला अनुसरून होईल. चौकशीचे काम प्रतिज्ञापत्र, कागदपत्र किंवा तोंडी पुराव्याने घ्यायचे याचा निर्णय आयोगाला असेल. साक्षी, पुरावे हे मराठीतून नोंदविले जाणार आहेत. जबाब नोंदविताना अनवधानाने झालेल्या चुका या त्याच दिवशी अथवा दुसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात नजरेस आणून द्याव्या लागतील. नोंदणीकृत कागदपत्रे व त्याच्या प्रमाणित नकलांना प्राधान्य दिले जाईल. कागदपत्रांच्या नकला मिळवण्याबाबतचा निर्णय आयोग घेईल. समन्स, नोटीस पाठविण्याचा खर्च संबंधित व्यक्तीला करावा लागेल. याशिवाय आयोगाच्या कामकाजाबद्दल वर्तमानपत्र व इंटरनेटवर मतप्रदर्शन, लेख प्रसिद्ध करता येणार नाही. या नियमांचा भंग करणार्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, दंगलीची सीआयडीतर्फे चौकशी करण्यात येत आहे. दंगलप्रकरणी 21 संशयितांना पोलिसांतर्फे अटक करण्यात आली होती. या सर्वांची न्यायालयाने जामिनीवर मुक्तता केली आहे.