आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हर डाऊन; आयटीआय प्रवेशप्रक्रिया रखडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांकरिता या वर्षापासून शासनाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यासाठी सुरू करण्यात आलेले संकेतस्थळच उघडत नसल्याने विद्यार्थ्यांचे गेल्या दोन दिवासांपासून हाल होत आहेत. परिणामी ऑनलाइन प्रक्रिया सुरू होण्याआधीच रखडल्याने विद्यार्थ्यांची भटकंती सुरू आहे.

सायबर कॅफेवर गर्दी
प्रवेशासाठी तंत्रशिक्षण विभागाने डब्लूडब्लूडब्लू डीव्हीईटी डॉट इन व डब्लूडब्लूडब्लू महारोजगार डॉट जीओव्ही डॉट इन. ही संकेतस्थळे दिली होती. मात्र हे संकेतस्थळच सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांना अर्जच दाखल करता येत नाही. तासन्तास सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी करूनही केवळ निराशाच हाती पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे.

तर वर्ष वाया जाईल
गेल्या दोन दिवसांपासून या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ते सारेच गोंधळात पडले आहेत. तसेच जर हा प्रकार असाच सुरू राहिला आणि तिकडे 11 वी साठीची प्रवेश प्रक्रिया बंद पडली तर आपले वर्ष वाया जाते की काय? अशी भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे.

विद्यार्थ्याना वेठीस धरू नये
आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावाहून यावे लागत आहे. जर संकेतस्थळाची अडचण होत असेल तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश देऊन प्रक्रिया सुरू करावी. विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, अशी मागणीही पालक व विद्यार्थ्यांमध्ये केली जात आहे.