आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात परीक्षांचा ‘मेगा’ रविवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रेल्वे आरआरबी विभाग, समाजकल्याण विभागासह विद्यापीठ अनुदान आयोगाची सेट अशा तीन परीक्षांमुळे जळगावात आज खर्‍या अर्थाने परीक्षांचा ‘मेगा’ रविवार होता. रेल्वेच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून आठ हजार विद्यार्थी तर समाजकल्याण व सेटच्या परीक्षेसाठी 3175 उमेदवार आले होते. त्यामुळे शहरातील हॉटेल्स, लॉज व सार्वजनिक निवासाची इतर ठिकाणे गर्दीने भरली होती. रेल्वेसाठी आलेल्या परीक्षार्थींनी रेल्वे स्थानकावरच रात्र कुडकुडत काढली. परीक्षेत कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याचे रेल्वेच्या व समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
रेल्वेच्या गृप डी भागासाठी खलाशी व हेल्पर या पदांसाठी परीक्षा झाली. शहरातील 10 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. आर.आर. विद्यालय, लुंकड कन्या शाळा, ओरिऑन, ला.ना.शाळा, मूजे महाविद्यालय या केंद्रांचा यात समावेश होता. परीक्षा घेण्यासाठी रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. शहरासह भुसावळातही ही परीक्षा झाली. यामुळे शनिवारपासून बिहारसह उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांची शहरात गर्दी होती. हजारो विद्यार्थी रात्रीपासूनच रेल्वेस्थानक परिसरात तळ ठोकून होते. सकाळी 11 ते 12.30 यावेळेत ही परीक्षा झाली. परीक्षा संपल्यानंतर परतीसाठीही रेल्वेस्थानक परिसरात मोठी गर्दी झाली होती.
3118 विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा
शहरातील 7 केंद्रांवर जिल्हाभरातील 3118 विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाची सेट परीक्षा दिली. सकाळी 10 ते दुपारी 4.30 या वेळेत ही परीक्षा झाली. विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रण विभागाने यावर नियंत्रण ठेवले. 225 पर्यवेक्षकांनी काम पाहिले.