आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात वर्षांच्या अनुष्काचे ९७ वेळा बदलले रक्त, शस्त्रक्रियेसाठी हवेत १५ लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - थॅलेसिमिया अाजारामुळे सात वर्षीय अनुष्काला दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागत अाहे. जन्माच्या तिसऱ्या महिन्यापासून लक्षात अालेल्या अाजारामुळे अनुष्काला ९७ वेळा रक्त दिले गेले अाहे. तिच्यावर शस्त्रक्रियेसाठी १५ लाख खर्च येणार असून, ते जमवण्यासाठी पालकांचे प्रयत्न अजून पूर्ण झाले नाहीत. अनुष्काला रक्त देण्यासाठी रावेरच तिचा परिवार झाला अाहे. तिच्यासाठी झालेल्या रक्तदान शिबिरातून अातापर्यंत २८५ पिशव्या रक्त जमा झाले अाहे.

रावेरातील (जि. जळगाव) ज्ञानेश्वर चौधरी यांचे लग्न सन २००६ मध्ये बेटावद (ता. जामनेर) येथील पल्लवीशी झाले. दोन वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली. अनुष्का तीन महिन्यांची असताना आजारी पडली. डाॅक्टांनी तपासणी केली असता तिच्या शरीरात केवळ ३.५ टक्के रक्त आढळले. यामुळे डॉक्टरांना थॅलेसिमिया आजाराची शंका आली. त्यानंतर ज्ञानेश्वर यांनी जळगावात पुन्हा तपासणी केली असता थॅलेसिमिया असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. ९७ वेळा अनुष्काला बाहेरून रक्त चढवण्यात आले. तिला पूर्वी महिनाभराने तर आता दर १५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. या आजारातून अनुष्काला पूर्णपणे बरे करण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट ही मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी सुमारे १४ ते १७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, आधीच होते नव्हते तेवढे खर्ची घातलेल्या ज्ञानेश्वर यांच्यासाठी ही रक्कम उभारणे अशक्य आहे. तरीही त्यांनी हिंमत सोडलेली नाही.

रक्तदाते सरसावले
एकीकडे आर्थिक ओढाताण आणि दुसरीकडे पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी तीळ-तीळ तुटणारा जीव, अशा कोंडीत सापडलेल्या ज्ञानेश्वरला प्रत्येकवेळी रक्त विकत घेऊन ते अनुष्काला चढवणे शक्य नाही. यासाठी त्यांनी शहरवासीयांना साद देत रक्तदानाचे आवाहन केले. त्यानुसार जून २०१० मधील पहिल्या शिबिरात ९२, जुलै २०१३मध्ये १०३, तर मे २०१६मधील शिबिरात रावेरातील ९० रक्तदाते अनुष्कासाठी पुढे आले. या सर्व पिशव्या रक्तपेढीत जमा करण्यात आल्या. यामुळे अनुष्कासाठी गरजेनुसार तिच्या ओ पॉझिटिव्ह गटाच्या रक्तपिशव्या मिळणे सोयीचे होते.

थेलेसिमिया म्हणजे काय?
थॅलेसिमिया हा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे. त्यात रुग्णाच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते, जे कोणत्याही औषधाने वाढवता येत नाही. थॅलेसिमिया मायनर आणि थॅलेसिमिया मेजर अशा दोन प्रकारात हे रुग्ण विभागले जातात. यापैकी थॅलेसिमिया मायनर असणाऱ्यांना बाहेरून रक्त द्यावे लागत नाही.

अाैषधाेपचार महाग
थॅलेसिमिया मेजर आजारात रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते. यामुळे त्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. हे प्रमाण घटवण्यासाठी लागणारी औषधे अत्यंत महाग आहेत.
- ज्ञानेश्वर चौधरी, अनुष्काचे वडील, रावेर
बातम्या आणखी आहेत...