आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणोशोत्‍सवः पर्यावरणासाठी भाविक सरसावले; शाडू मातीच्या मूर्तींना पहिली पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गणपतीचा उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असून बाजारात गणेश मूर्तींची लगबग सुरू झाली आहे. भक्तांचा यंदाही शाडू मातीच्या मूर्ती घेण्याकडे कल वाढला आहे. पर्यावरणाच्या वाढत्या र्‍हासामुळे इको फ्रेण्डली गणपतीची संकल्पना गेल्या वर्षी ‘दिव्य मराठी’ने मांडली होती. त्यास जळगावकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. यंदा देखील शहरातील प्रमुख शाडू मातीच्या गणपती विक्रेत्यांकडे भाविकांची गर्दी होत आहे. शहरवासीयांनी पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले असून नागरिकांमध्ये याबाबतीत मोठय़ा प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे. घाणेकर ब्रदर्स यांच्याकडे इको फ्रेण्डलीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या. याचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेश मूर्ती हळदीच्या रंगांपासून बनवलेल्या आहेत. शाडू मातीच्या यात वापर करण्यात आला असल्याने त्या पूर्णत: इको फ्रेण्डली मूर्ती आहेत.

1500 मूर्ती मागवल्या

गणेश मूर्ती लवकर विसर्जित व्हावी या कारणाने शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जात आहे. 251 रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंतच्या शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. यंदा 1500 मूर्ती मागवल्या असून पूर्ण विकल्या जातीलच असा विश्वास आहे. कारण गेल्या वर्षापासून भाविकांचा इको फ्रेण्डली मूर्ती वापरण्याचा कल वाढला आहे. दीपक घाणेकर, घाणेकर ब्रदर्स

भाविकात जागरूकता वाढीस

साधारण जून, जुलै महिन्यात आम्ही मूर्ती नोंदणीस सुरुवात करतो. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 100 मूर्तींची वाढ झाली आहे. सन 2012मध्ये 350 गणपतीच्या मूर्ती तर यंदा 450 मूर्तींची नोंदणी झाली आहे. नागरिक अगोदर विचारपूस करून गेले आहेत. त्यामुळे लोकांची पसंती यंदा शाडू मातीच्या मूर्तींना मिळत आहे. पंकज दशपुत्रे, शाडू माती मूर्तिकार