शहादा: येथील नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या हत्येप्रकरणी मुख्य संशयित आरोपी प्रेम उर्फ साजिद अहमद शेख याला शुक्रवारी सुरत येथून अटक करण्यात आली. दंगल जाळपोळीनंतर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शहरात शुक्रवारी बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाल्याचे दिसून आले.
एमआयएमचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्या हत्येनंतर खेतिया रोड परिसर गरीब नवाज नगरात उसळलेल्या दंगलीत अनेक घरे दुकानांची जाळपोळ झाली. समाजकंटकांनी तेली यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्या संशयितांच्या घरांमधील संसाराेपयोगी वस्तू, रोख रक्कम मौल्यवान वस्तू लुटल्या. ज्यांचा या घटनेची संबंध नाही त्यांचीही घरेही जाळण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पाेलिस बंदोबस्त कायम आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे हे रात्री तळ ठोकून होते. शहरात शुक्रवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र, ज्या परिसरात घटना घडली त्या मुस्लिमबहुल वसाहत असलेल्या गरीब नवाज कॉलनी भागात अद्यापही तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे पोलिस महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. दंगलीत अनेक दुकाने दहा ते पंधरा घरे जाळण्यात आली अाहेत. त्यामुळे काहींचा संसार उघड्यावर आला आहे. दंगलीत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
दंगलग्रस्त खेतिया रस्त्यावर असलेली मिशन शाळा शुक्रवारी सुरू झाली. अनेक पालक मुलांना घेऊन सकाळी शाळेत आले हेतो. काही पालक शाळा सुटेपर्यंत शाळेच्या आवारात थांबून हाेते. दंगलीच्या दहशतीमुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. या भागातील दवाखाने पेट्रोल पंपही सुरळीत सुरू झाले आहेत. खून प्रकरणातील फरार संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. जाळपोळ, दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईस वेग देण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रमजान महिना सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील चार रस्ता, जामा मशीद चौक, बागवान गल्ली भागात पोलिस बंदोबस्त कायम आहे. दरम्यान, दंगलीत जखमी झालेल्या पाचही जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.
४२ मुख्य अारोपींसह ३०० जणांवर गुन्हे
दंगलप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४२ मुख्य आरोपींसह ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले. दंगल प्रकरणी पोलिसांनी मोईन सलीम बेलदार, शे. आसिफ शे. हुसेन, मोहसीन शेख मेहतर, रहीम गनी बेलदार, सलीम मुश्ताक खाटीक या पाच आरोपींना अटक केली आहे.