आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात नवोदितांनी गाजवला ‘शनिवार कट्टा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील सांस्कृतिक चळवळीला उर्जितावस्था देणार्‍या ‘अंतर्नाद’ प्रतिष्ठानने शनिवार कट्टा सुरू केलेला आहे. त्यात रमाकांत भालेराव यांनी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात स्वयंस्फूर्तपणे ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकातील यमन कल्याण रागातील तराना लयबद्ध सुरात सादर करून रसिकांची मने जिंकली. डॉ. पूर्वा खानापूरकर, संदीप जोशी या नवोदितांनीही ‘शनिवार कट्टा’ गाजवला.

विद्यार्शम स्कूलमध्ये आयोजित या सांस्कृतिक मैफलीचा शुभारंभ नटराज पूजनाने डॉ. पूर्वा खानापूरकर, संदीप जोशी, चैत्राली विसपुते यांनी केला. मैफलीची सुरुवात डॉ. पूर्वा खानापूरकर यांनी ‘जय शारदे वाघेश्वरी’ या सरस्वती वंदनाने केली. त्यानंतर त्यांनी ‘फुलले रे क्षण माझे, हसले रे क्षण माझे’ हे खर्जातील आर्जवात सादर करून मैफलीचा नूर पालटवला. कोणतीही वाद्य, ध्वनीक्षेपक यंत्रणा नसतानाही त्यांनी तीन सुमधुर गीते सादर केली. प्रत्येक गीताला रसिकांच्या भरभरून टाळ्या मिळाल्या. कलाक्षेत्रातील मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

विद्याश्रम स्कूलमध्ये अंतर्नाद प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शनिवार कट्टा उपक्रमात प्रथम सत्रात गीतगायन करताना डॉ. पूर्वा खानापूरकर व उपस्थित कलारसिक.

स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका केंद्र
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचा मुद्दा अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी या कार्यक्रमात मांडला. लवकरच ही अभ्यासिका सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. रोटेरियन सुनील पाटील यांनी अभ्यासिकेसाठी ग्रंथसंपदा देण्याची ग्वाही दिली. कोटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. आर. एच. पाटील यांनी स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार दर्शवला.

‘दिये जलते है फुल खिलते है’
संदीप जोशी यांनी ‘हे गणपती, हमे शक्ती दो हमे भक्ती दो’ ही गणेश आराधना करणारे गीत म्हटले. त्यानंतर त्यांनी ‘दिये जलते है फुल खिलते है, बडी मुश्किल से दुनियामे दोस्त मिलते है’ हे गीत सादर केले. ‘सामना’ मराठी चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या गीताला प्रचंड टाळ्या मिळाल्या. ‘मै शायर बदनाम, मै चला’ हे गीत लयबद्ध सुरात म्हटले.

चैत्रालीचे संशोधनावर व्याख्यान
नाहाटा महाविद्यालयातील चैत्राली विसपुते या विद्यार्थिनीने ‘संशोधन काळाजी गरज’ या विषयावर भाष्य केले. संशोधन फक्त पाश्चात्य शास्त्रज्ञांनीच करावे आणि सार्‍या जगाने त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळावी, असाच प्रघात पडला आहे. म्हणूनच तर आपल्या देशात संशोधनवृत्तीला चालना देण्यासाठी जे संशोधनाचा प्रयत्न करीत असतील त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी, असा विचार तिने मांडला.

उपक्रमाला वैचारिकतेची दिली जोड
गीतगायन आणि वैचारिक भाष्य असे या वेळच्या शनिवार कट्टय़ाचे स्वरुप होते. महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी राबवल्या जाणार्‍या या उपक्रमात आता नवोदित कलावंत स्वयंप्रेरणेने सहभागी होऊ लागले आहे. यशस्वितेसाठी अंतर्नाद प्रतिष्ठानचे सचिव वीरेंद्र पाटील, नारायण माळी, हरीष भट, पंकज जोशी, प्रभाकर चौधरी, रुपेश शेळके, किरण बाविस्कर, राजू वारके, हरीष पाटील, प्रथमेश जोशी, रार्जशी महाजन, दीपाली सोनार, संदीप सपकाळे, विशाल कुंवर, चंद्रकांत अंबाडे, मंगेश जोशी, श्वेता पाठक, राजेश पाटील, वसंतराव पाटील, नीलेश रायपुरे, प्रमोद ढगे यांनी पर्शिम घेतले. ‘शनिवार कट्टा’ उपक्रमात आता महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसह शहरातील नवोदित कलावंतांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. भविष्यात या उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचा अंतर्नादचा प्रयत्न आहे.

‘यमन’ रागातील तराना
नाट्यकलावंत रमाकांत भालेराव यांनी ‘जो दिया था तुमने एक दिन, मुझे फिर वो प्यार दे दो’ हे निर्व्याज प्रेमरंगाची उधळण करणारे गीत सादर केले. त्यांनी सादर केलेल्या या गीताने ‘ओल्ड इज गोल्ड’ या म्हणीची प्रचिती आली. सूत्रसंचालन जीवन सपकाळे यांनी केले. कला रसिकांचे आभार सुमीत पाचपांडे यांनी मानले.