आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Divya Marathi, Khandesh Vikas Aghadi, Divya Marathi

शरद पवारांच्या उपस्थितीत खान्देश विकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महिनाभर चाललेल्या चर्चेच्या फेर्‍यांनंतर राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करणार्‍या खान्देश विकास आघाडीने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सागर पार्कच्या प्रचारसभेत शक्तिप्रदर्शन केले. या वेळी आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांनी जाहीर पाठिंब्यामागील कारणे स्पष्ट केली. दरम्यान, गुलाबराव देवकरांच्या गटानेदेखील ही संधी साधून ग्रामीण मतदारसंघातील गर्दी खेचून पक्षांतर्गत विरोधकांचे तोंड बंद केले.


घरकुलप्रकरणी कारागृहात असलेल्या शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील दोन्ही आमदारांची भूमिका लोकसभेसाठी निर्णायक आहे. खाविआचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी गुरुवारची ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या गटाने ग्रामीण मतदारसंघातील गर्दी खेचण्यासह सभेचे चोख नियोजन करून सक्रिय असल्याचे सिद्ध केले. खाविआतर्फे महापौर राखी सोनवणे, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सदाशिव ढेकळे, किशोर पाटील तर देवकरांचे बंधूही व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, रमेश जैन यांनी त्यांच्या भाषणात खाविआ राष्ट्रवादीला का पाठिंबा देत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.


सभेला दीड तास उशीर : सायंकाळी 7 वाजेची सभा 8.30 वाजता सुरू झाली. पवारांचे आगमन दीड तास उशिरा झाल्याने बाहेरगावाहून आलेले नागरिक कंटाळले. सभा अध्र्यावर आली असताना अनेकांनी तेथून काढता पाय घेतला. खुद्द पवारांनी इतर वक्त्यांना भाषण आटोपते घेण्याची सूचना केली.


चाळीसगाव-रावेर येथे काय म्हणाले पवार?
चाळीसगाव गेल्या 10 वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने मते मागणार्‍या भाजपला जनतेने साफ नाकारले होते. त्या वेळी एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले. तीच परिस्थिती यंदाच्या निवडणुकीतही असून व्यक्तीकेंद्रित प्रचाराचा कोणताही फायदा भाजपला होणार नाही. या उलट कॉँग्रेसने कधीही व्यक्तीकेंद्रित प्रचारावर भर दिला नाही, असे प्रतिपादन शरद पवार यांनी चाळीसगाव येथे डॉ.सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले.


रावेर गुजरातमध्ये पूर्वी 17 टक्के विकासदर होता. तो आता 8 टक्क्य़ांवर आला आहे. म्हणजेच विकास नाही, तर घसरण आहे. देशाची ही गत करण्याचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू. मोदी सरकारमधील कित्येक मंत्री दोषी असूनही त्यांना पाठीशी घातले जाते, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रावेरमधील उमेदवार मनीष जैन यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रावेर येथे पवार यांची रावेरमध्ये जाहीर सभा झाली.


मोदी प्रवृत्तीला विरोध
शरद पवार : लोकशाहीत राजकारणी चुकले तर जनता धडा शिकवते. 1977मध्ये आम्ही धडा घेतला. पंतप्रधान होण्यासाठी लोकशाही पद्धतीनुसार जावे लागते; परंतु भाजपने मतदानापूर्वीच मोदींच्या नावाने नागरिकांच्या मूलभूत हक्कावर अत्याचार करून पंतप्रधानपदाचा उमेदवार लादला; पण मोदी हे विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व नाही. त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे.


खाविआमुळे विश्वास वाढला
डॉ.सतीश पाटील : तयारी आधीपासून होती; परंतु रमेश जैन यांनी उशिरा पत्ते उघडले. गेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधकांना मदत केली; आता आमच्यासोबत आहेत. त्यामुळे उत्साह वाढला आहे.


देवकररूपी सिंह गेला
साहेबराव पाटील : राखी सोनवणे आणि रमेश जैन यांच्या रूपाने जळगावात राष्ट्रवादीचा गड हाती आला; परंतु देवकररूपी सिंह गेल्याची खंत आहे.


ठोस आश्वासन हेच पाठिंब्याचे कारण
रमेश जैन : जळगाव शहराच्या विकासासाठी शासनाकडे पडून असलेले 5 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवार आणि अजित पवार यांनी दिले. याशिवाय व्यापार्‍यांच्या समस्या, विकासाचा आराखडा यासंदर्भातही त्यांनी मदतीचे ठोस आश्वासन दिल्यामुळेच खाविआने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.