आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमला सफरचंदांनी आणला बाजारात स्वस्ताईचा नवा बहर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे विकल्या जाणार्‍या सफरचंदाचा बाजार एकदम स्वस्त झाला आहे. शिमल्याहून येणार्‍या सफरचंदांनी शहराची बाजारपेठ काबीज केली असून, दरही 60 ते 70 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. सिमला सफरचंदांची घाऊक बाजारात दररोज एक ट्रक आवक होत आहे. सध्या स्वस्त दरात विकले जाणारे हे फळ उपवास करणार्‍यांसाठी पर्वणी ठरत आहे.

शहरातील बाजारात सफरचंदांची किंमत वर्षभर जवळपास दीडशे ते दोनशे रुपये किलो इतकी असते. त्यामुळे हे फळ खाणे सर्वांच्याच आवाक्यात नसते. त्यामुळे महिन्यातून कधीतरी व आजारी असतानाच ते खाल्ले जाते. सध्या सफरचंदाच्या किमती कमी झाल्या आहेत. नवीन बहरातील सिमला सफरचंदांची आवक आता बाजारात होऊ लागल्याने 70 रुपये किलोप्रमाणे घाऊक बाजारात त्याची विक्री होत आहे. तर किरकोळ बाजारात 80 रुपये किलोप्रमाणे ते उपलब्ध आहे. त्यातही गुणवत्तेनुसार एक नंबर ग्रेड सफरचंद काही महिन्यांपूर्वी 130 रुपये किलो होते तर आता 80 ते 100 रुपये किलोप्रमाणे घाऊक बाजारात विक्री होत आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथील सफरचंद दिल्ली, चंदीगड, सोलन येथून मागविली जातात. सध्या घाऊक बाजारात दररोज एक ट्रक सफरचंदांची आवक सुरू आहे. एका ट्रकमध्ये साधारणपणे 15 टन सफरचंद येतात. तर 20 ते 25 किलोची एक पेटी असते. एक ट्रक मालाची पाच लाख रुपयांपर्यंत किंमत आहे. सिमला येथून आॅगस्टपासून आवक सुरू होते. ती साधारणपणे आॅक्टोबरपर्यंत होते.

त्यानंतर नोव्हेंबरपासून काश्मीर येथील सफरचंदाची आवक बाजारपेठेत सुरू होते. सध्या सिमला येथून आवक सुरू असल्याने त्याच्या कि मती आवाक्यात असून मागणी वाढत आहे. गाड्यांवरही चौकात व रस्त्याने सफरचंद विक्रीला आलेले आहेत. मध्यम आकारातील लाल तर काही अर्धे हिरवे लाल रंगाचे हे सफरचंद लक्ष वेधून घेत आहे.

दरावरून होतेय स्पर्धा
बाजारात नव्याने आलेल्या सफरचंदांचे दर घसरले आहेत. पाचकंदील परिसरात सकाळी साठ रुपये किलोप्रमाणे विकले जाणारे सफरचंद सायंकाळपर्यंत चाळीस रुपये किलो दरापर्यंत घसरलेले असतात. त्यातही आणखी स्पर्धा होते. हिरवट रंगाच्या सफरचंदांना फारसी मागणी नसते. त्यांचे दर 30 रुपये किलोपर्यंत घसरतात. दुकानांमध्ये असलेल्या सफरचंदांचे दर मात्र जैसे थे आहेत.

हंगामात वाढते आवक
सध्या सफरचंदांना वाढती मागणी आहे. उपवास करणार्‍यांसाठी या फळाचा चांगला आधार होतो. विक्रेते हंगामानुसार फळे विकतात. गेल्या महिन्यापर्यंत आंबा आणि केळीला मागणी होती. मात्र, आता त्याची आवक कमी झाली आहे. सफरचंदांचा हा काळ आहे. हिमाचलमधून येणार्‍या सफरचंदांसाठी किंमतही मोजावी लागते. सफरचंदाला तशी वर्षभर नियमित मागणी असते.
शिवदास महाले, फळविक्रेता