आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपुरच्या युवकाची आत्महत्या नसून खून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर - मारहाणीमुळे मृत्यू झालेल्या युवकाने आत्महत्या केल्याचा बनाव रचून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणा-यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हा आदिवासी एकता परिषद व वीरांगना असोसिएशनतर्फे गुरुवारी येथील उपविभागीय पोलिस अधिका-यांना निवेदन देण्यात आले.
सजगरपाडा (ता. शिरपूर) येथील प्रकाश इंदास पावरा (22) हा वडील इंदास पावरा व आई सो-याबाई यांच्यासह अजंदे बु. (ता. शिंदखेडा) येथील महेंद्र महाजन यांच्याकडे सालदार म्हणून कामास होता. त्याने 16 जानेवारी रोजी स्वत:च्या विवाहासंदर्भातील कामासाठी गावी जाण्याबाबत महाजन यांच्याकडे परवागनी मागितली. त्यावरून वादविवाद होऊन महाजनने केलेल्या मारहाणीत प्रकाशचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती महेंद्र महाजनने नरडाणा पोलिसांना दिली. खरा प्रकार पोलिसांना सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी त्याने प्रकाशच्या नातलगांना दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. याकामी संशयितांना सरपंच मिलिंद भावसार हे मदत करीत असल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. प्रकाश पावराच्या मृत्यूची चौकशी होऊन संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी आदिवासी एकता परिषदेचे जिल्हा सचिव दीपक अहिरे, कांतिलाल वळवी, युवराज पवार, दीपक ठाकरे, शांतिलाल भील, राजेश मालचे, गणेश सोनवणे, आनंदा मोरे, जगदीश पावरा, सुनील सोनवणे, वीरांगना संघटनेच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.