आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena And Nationalist Cogress Creates Big Challenges Before Eknath Khadse

दिग्गजांच्या लढती: एकनाथ खडसेंना खिंडीत गाठण्यास सेना, राष्ट्रवादी सरसावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अरुण पाटील व आणि शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी टार्गेट केले आहे. एकीकडे भाजपच्या प्रचारासाठी खडसे राज्यभर दौरे करीत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीने त्यांना खिंडीत गाठण्यासाठीचे डावपेच लढवणे सुरू केले आहे. आपण निवडून येण्यापेक्षा खडसेंना रोखा, हा दोन्ही पक्षांचा समान अजेंडा असल्याचे जाणवते. मोदी लाटेवर स्वार झालेल्या या मतदारसंघात लोकसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारानेही चांगली मते घेतली होती. त्यामुळे आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी चुरशीची लढाई पाहायला मिळणार यात शंका नाही.

राष्ट्रवादीचा कडवा संघर्ष
या वेळी उमेदवार बदलून दिलेल्या राष्ट्रवादीनेदेखील खडसेंच्या विरोधात पक्षीय ताकद वाढवण्यासाठी मोट बांधली आहे. भाजपमध्ये असताना अन्याय झालेल्या माजी आमदार अरुण पाटलांना येथे उमेदवारी मिळाली आहे. मतदारसंघातील रावेर तालुक्यातील गावांमध्ये त्यांचा संपर्क, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील गावांमध्ये नातलगांचा गोतावळा, राष्ट्रवादीची हक्काची व्होट बँक आणि अ‍ॅड. रवींद्र पाटलांची साथ यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपला सक्षमपणे आव्हान दिले जात आहे.

काँग्रेसही रिंगणात
काँग्रेसतर्फे योगेंद्रसिंग पाटील रिंगणात आहेत. काँग्रेसची हक्काची मते, वैयक्तिक संबंध यामुळे त्यांचीही उमेदवारी निर्णायक ठरणार आहे. चार उमेदवारांमुळे मतांची विभागणी कशी होते, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

‘मुक्ताईनगर’वर लक्ष : शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी खडसे यांना टार्गेट केले आहे. खडसेंवर युती तोडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत आदित्य ठाकरेंनीही जळगावातील सभेत ‘मुक्ताईनगरकडे आपले विशेष लक्ष आहे,’ असे सांगितले होते.

एकनाथ खडसे : बलस्थाने
* २५ वर्षांपासून मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला
* मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याने सहानुभूती
* कुटुंबीय, कार्यकर्त्यांनी सांभाळली प्रचाराची धुरा
उणिवा
* राज्यभर प्रचार करताना कार्यक्षेत्रात संपर्क कमी
* पक्षांर्तगत विरोधकांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या छुप्या कारवाया

चंद्रकांत पाटील : बलस्थाने
* भाजपचा मतदारसंघ असूनही भक्कम फळी
* सर्व पक्षांतील खडसे विरोधकांचा पाठिंबा
* मतदारसंघातील जातीय समीकरणे पथ्यावर

उणिवा
* स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्वाचा अभाव
* आंदोलनापलीकडे ठोस कोणतेही काम नाही
* प्रचार यंत्रणा तोकडी