आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Nationalist Congress News In Marathi, Pachora, Divya Marathi

पाचोर्‍यात राष्ट्रवादी-शिवसेनेत दंगल; पाच जखमी, 16 जणांवर गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोरा - पक्षाचे बॅनर लावण्याच्या कारणावरून राष्‍ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते रविवारी एकमेकांशी भिडले. या हाणामारीत तलवार, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर करण्यात आला. त्यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले असून, दोघांना जळगावला हलवले आहे. याप्रकरणी दोन्ही गटांतील 16 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने वर्चस्वाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

पाचो-यातील महाराणा प्रताप चौकात बॅनर लावण्याच्या कारणावरून शिवसेना व राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी वाद झाला होता. हा वाद त्या वेळी मिटलाही होता. मात्र, त्यानंतर दुस-या दिवशी रात्री महाराणा प्रताप चौकात दोन्ही गटांचे कार्यकर्ते पुन्हा याच कारणावरून एकमेकांशी भिडले. या वेळी तलवार व लाठय़ा-काठय़ांचा सर्रास वापर झाला. त्यात पाच जण जखमी झाले. याप्रकरणी 16 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ.सुपेकर, अ.पोलिस अधीक्षक संदीप जाधव व उपअधीक्षक रमेश गवळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पाचोर्‍यातील परिस्थिती नियंत्रणात असून, तणावपूर्ण शांतता आहे.

निवासस्थानांबाहेर बंदोबस्त
आमदार दिलीप वाघ व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटील यांच्या निवासस्थानांबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करून पोलिस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर भूमिका घेतील, असे अधीक्षक सुपेकर यांनी सांगितले.

पोलिस बंदोबस्त तैनात
पाचो-यात दंगलीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक व तीन पोलिस उपअधीक्षकांसह 65 पोलिसांना जळगावहून पाचो-यात पाठवण्यात आले आहे. तसेच दोन रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सही तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती.

दोघांना जळगावला हलवले...
या घटनेतील गंभीर जखमी चंद्रकांत नाईक व आकाश सूर्यवंशी या दोघांना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

एकमेकांविरुद्ध फिर्याद
पोलिसांत राष्‍ट्रवादी व शिवसेना कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. राष्‍ट्रवादीचे सूर्यकांत नाईक यांनी प्रथम फिर्याद दिली. त्यात रवींद्र पाटील, समाधान पाटील, संदीप पाटील, जितेंद्र पेंढारकर, भूषण पेंढारकर व उमेश पेंढारकर यांनी संगनमताने माझ्यावर हल्ला केला. तसेच तलवारीने वार केला. मात्र, तो मी चुकवला. याशिवाय समाधान पाटील याने काचेची बाटली आकाश सूर्यवंशीच्या डोक्यात मारली, तर सूर्यकांत पाटील याची 15 ग्रॅमची सोन्याची चेन लंपास केल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत भूषण वाघ, गौरव वाघ, दीपक पाटील, शशी डॉक्टर, सूर्यकांत नाईक यांचा मोठा मुलगा श्याम नाईक, उमेश एरंडे, करण सूर्यवंशी, आकाश सूर्यवंशी, चंद्रकांत नाईक व अक्षय पाटील यांनी माझ्यावर हल्ला करून गंभीर इजा केल्याचे म्हटले आहे.