आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Divya Marathi, Jalgaon Lok Sabha Constituncy

जळगावातील शिवसैनिकांना हवीय सन्मानाची वागणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपाने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या वागणुकीमुळे प्रत्येक मेळाव्यात शिवसेनेत नाराजीचा सूर उमटत आहे. जळगाव शहरातील प्रचारातही महिला पदाधिकारी वगळता कोणीही सहभागी न झाल्याने अजूनही मतभेद कायम असल्याचेच चित्र आहे. कोणाचाही फोन येत नसल्याने सन्मानाशिवाय कसे जायचे? असा प्रश्‍न शिवसैनिक उपस्थित करीत आहेत.


जळगाव लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांसाठी मताधिक्य मिळवून देणारा मतदारसंघ म्हणजे जळगाव शहर आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर मेळाव्यांव्यतिरिक्त अजून प्रचाराला सुरुवात नाही. मात्र, भाजपने जुने जळगावातील विठ्ठल मंदिरात नारळ वाढवून प्रचार सुरू केला; यावेळी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी वगळता शहरातील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे जिल्ह्याचे नेते एकाच व्यासपीठावर आले असले तरी शहरातील भाजपा-सेनेतील मतभेद काही मिटलेले दिसत नाहीत.


भाजपाकडून साधा फोनही नाही
शिवसेनेचे शहरातील पदाधिकारी गजानन मालपुरे यांनी मला भाजपकडून साधा फोनही आलेला नसल्याचे सांगितले. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगण्याचे शिकवले आहे. त्यामुळे साधा निरोपही नसताना स्वत:हून जाणे कितपत योग्य आहे? भाजपने पाच वर्षांत किती वेळा आम्हाला बोलावले; सन्मानाने बोलावल्यास जोमाने कामाला लागू, असेही मलापुरे ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले.


यापूर्वी त्यांना दिले निरोप
शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी होत आहेत. मालपुरेंना फोन केला परंतु संपर्क झाला नाही; यापूर्वी त्यांना निरोप देण्यात आला आहे, ते नसले तरी अन्य कार्यकर्ते प्रचारात येत असल्याचे भाजपाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांना फोडण्याचा आरोप
शहरात प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा होणे गरजेचे होते. नियोजन करताना गृहीत धरणे योग्य नाही. प्रचार नारळ वाढवण्यासंदर्भात भाजपाकडून कळवलेही जात नाही; मग शिवसेनेची त्यांना खरंच गरज आहे का? असा सवाल शिवसैनिक विचारत आहेत.