आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हर हर महादेव’चा गजर; ओंकारेश्वर, शिवधामसह मेहरूणच्या शिव मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी शहरातील ओंकारेश्वर, शिवधाम आणि मेहरूणमधील शिव मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रीघ लागली होती. दिवसभर विविध मंदिरांमध्ये ‘ओम नम: शिवाय..’, ‘हर हर महादेव..’च्या गजरासह मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिमय झाले होते. श्रावण ात महिनाभर भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात पहिल्या श्रावण सोमवारी विविध कार्यक्रम झाले.
श्रावणातील सोमवारला खूप महत्त्व असते. यंदा या महिन्यात पाच सोमवार आहेत. पहिल्याच सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी आणि अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रावणानिमित्त शिव मंदिरांवर विद्युत रोषणाई केली आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर, शिवधाम मंदिर व गोलाणी मार्केटमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील महादेवाचे भाविकांनी अभिषेक करून दर्शन घेतले.
अभिषेकासाठी स्वतंत्र व्यवस्था
ओंकारेश्वर मंदिरात महिला आणि पुरुषांकरिता दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अभिषेक करण्याची सुविधाही करण्यात आली. मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने परिसर झगमगून निघाला.
108 बेलपत्रांचे गुच्छ
श्रावणात महादेवाच्या पिंडीला बेलपत्राने अभिषेक केला जातो. त्यामुळे सोमवारी बेलाच्या पानांना मोठी मागणी होती. विक्रेत्यांनी 108 बेलपत्रांचे गुच्छ उपलब्ध करून दिले होते. दिवसभर मंदिरांबाहेर बेलाची पाने भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात भगवान शंकरची आरती करताना पुरोहित, तर गाभार्‍यात दर्शनासाठी उभे असलेले भाविक.