आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांच्या कमांडो अॅक्शनचा जगात अभ्यास व्हावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; जेम्सबाँडसह इतर देशांतील कमांडो अॅक्शन पाहून आपण भारावून जात आहोत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, संपर्काची साधने नसतानाही लाल महलाच्या युद्धात सव्वा लाख सैनिकांचा पहारा असताना केवळ २०० मावळ्यांसह शाहिस्तेखानाची बोटे कापून अक्षरश: रक्ताची होळी खेळली. महाराजांची ही खरी ‘कमांडो अॅक्शन’ होती. या कमांडो अॅक्शनचा भारताच्या जवानांसह जगाने अभ्यास करावा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.

राम आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘लाल महलातील युद्ध’ या विषयावर आयोजित व्याख्यानात राहुल सोलापूरकर बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट यांनी साेलापूरकर यांचा सत्कार केला. सोलापूरकर यांनी विविध पुराव्यांचा संदर्भ देत शिवाजी महाराजांचा माहीत नसलेल्या इतिहासाची श्रोत्यांना अनुभूती दिली. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या लढाया, शौर्याचे वर्णन सोलापूरकर यांच्या भारदस्त आवाजात ऐकताना अंगावर शहारे येत होते. त्याचबरोबर उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून येत होता. रायगडावरचे युद्ध, पन्हाळ्याचा सिद्धी जोहरचा वेढा, प्रतापगडावरचे युद्ध, उंबरखिंडीत कारतलब खानाची केलेली कोंडी, अफजलखानाचा वध आदी लढायांचे वर्णनही त्यांनी केले.

‘राम आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘लाल महलातील युद्ध’ या विषयावर बोलताना राहुल सोलापूरकर तर व्याख्यान ऐकण्यासाठी कांताई सभागृहात झालेली प्रेक्षकांची गर्दी.

केवळ दोन लढाया हरले
बाजीराव पेशवे यांनी आपल्या कारकिर्दीत ३६ लढाया जिंकल्या. ते एकही लढाई हरले नाहीत. मात्र, त्यापैकी केवळ आठ लढाया त्यांनी उघडपणे लढल्या. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज २६ लढायांपैकी केवळ दोन लढाया हरले. मात्र, ते सगळ्या मोहिमांत प्रत्यक्षरीत्या सहभागी होत असत, असेही राहुल सोलापूरकर यांनी सांगितले.

महाराणा प्रताप यांच्या इतिहासातून शिवाजी महाराजांनी युद्धनीतीचे धडे घेतले. शिवाजी महाराज आयुष्यात कोणतीही लढाई हत्तीवर लढले नाहीत. एकदा वापरलेले युद्धतंत्र त्यांनी पुन्हा वापरले नाही. अादिलशाही निजामशाहीमधील युद्धरेषा कायम ठेवली. दोन शत्रूंना एकत्र आणण्याचे युद्धतंत्र त्यांनी अवलंबले. त्यांचे गुप्तहेर खाते सर्वाेत्कृष्ट होते. छत्रपतींच्या १०० कोसांच्या परिघात काय घडते? याबाबत कळवायचे. त्यानुसार ते युद्धनीती ठरवायचे.

शिवरायांच्या युद्धनीतीवर सविस्तर विवेचन
शिवाजी महाराजांनी लाल महलातील युद्ध चैत्र शुद्ध अष्टमीला केले. त्यावेळेस रमजान महिन्याचा सहावा उपवास सुरू होता. शिवाजी महाराजांनी मध्यरात्री शाहिस्तेखानाचा खात्मा केला होता. या युद्धनीतीचा अवलंब अमेरिकेने करून रमजान महिन्यात सहाव्या दिवशीच्या उपवासाला मध्यरात्रीच लादेनचा खात्मा केला. शिवाजी महाराजांनी युद्धापूर्वी लाल महलाची प्रतिकृती बनवली होती. त्याचप्रमाणे अमेरिकेनेही लादेनच्या घराची प्रतिकृती बनवून सराव केला होता. व्हिएतनाम युद्धातही शिवाजी महाराजांची युद्धनीती अवलंबण्यात आली हाेती, असेही राहुल साेलापूरकर यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेने छत्रपतींच्या युद्धनीतीनेच केला ओसामा बिन लादेनचा खात्मा
बातम्या आणखी आहेत...