आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपच्या एकीची ताकद आणि बेकीचा तोटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणूकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढावे, असा सूर निघत आहे. तर भाजपच्या वाढत्या महत्वकांक्षेमुळे शिवसैनिकही स्वबळाची भाषा करीत आहेत. हिंदुत्वाच्या मुद्यावर २५ वर्षांपासून एकत्र असलेल्या शिवसेना-भाजप युतीमधील संबंध कमालीचे ताणले गेले असताना "दिव्य मराठी'ने खान्देशातील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा आढावा घेतला. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीतील मतदानाच्या आकडेवारीवरून ढोबळ मानाने शिवसेना-भाजपच्या अंदाजे किती जागा येऊ शकतात. तसेच दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्यास कोणत्या प्रतिस्पध्याला फायदा होऊ शकतो? याचा ताळेबंद मांडला. लोकसभेतील मोदी लाटेचा प्रभाव आणि आघाडी सरकारविरोधातील रोष विधानसभा निवडणूकीतही कायम रािहल्यास खान्देशातील एकूण २० जागांपैकी प्रत्येकी १० जागा शिवसेना-भाजपच्या खात्यात जातील. मात्र स्वबळावर लढल्यास हे गणित पुरते उलटे होऊ शकते. यात राष्ट्रवादीला ११ तर काँग्रेसला ९ जागा मिळू शकतात. अर्थात यामध्ये सुरेश जैन (जळगाव शहर), विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (मुक्ताईनगर ) अशा काही दिग्गजांच्या मतदारसंघात फारसा फरक पडणार नाही.
स्वबळावर लढल्यास दोघांनाही घ्यावा लागेल सक्षम चेहऱ्यांचा शोध
चरणसिंग पाटील

जळगाव - गेल्या २५ वर्षांपासून एकजुटीने काँग्रेसविरोधात लढणाऱ्या भाजप व शिवसेना युतीत जागा वाटपावरून वाद सुरू आहे. अजूनही तिढा सुटलेला नाही. याचा परिणाम जळगाव जिल्‍ह्यातही जाणवतोय. स्वतंत्र लढल्यास दोघांनाही सक्षम चेहऱ्यांचा शोध घ्यावा लागणार हे निश्चित आहे. कारण जिल्‍ह्यातील काही मतदारसंघांचा ट्रेंड लोकसभा व विधानसभा निवडणूकीत वेगवेगळा पाहायला मिळाला आहे.

विधानसभेत प्रदेश पातळीवर जागा वाटपात अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघ्ये चार दिवस शिल्लक आहेत. त्यात नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आग लागत असून वातावरण आणखी तापत आहे. यात जिल्‍ह्यात भाजपप्रमाणेच शिवसेनाही स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहे. विधानसभेचे ११ पैकी ६ मतदारसंघ हे शिवसेनेकडे तर ५ भाजपकडे आहेत. असे असले तरी गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांनी सर्वच ठिकाणी संघटन वाढवले आहे. एेनवेळी भाजप- सेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली तर सक्षम चेहऱ्यांचा शोध घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता अधिक असून कोणाच्या पारड्यात किती यश पडते हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
जळगाव जिल्‍ह्यात विधानसभा मतदारसंघात कोणाची कुठे ताकद?
जळगाव शहरात भाजपला आघाडी असली तरी शिवसेनेचे आमदार सुरेश जैन यांच्या खाविआची महापालिकेत सत्ता आहे. सुरेश जैन म्हणजेच खाविआ आणि खाविआ म्हणजेच शिवसेना अशी स्थिती आहे. भाजपनेही लोकसभेच्या निमित्ताने संघटन वाढवले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेना पाच वर्षांपासून कामाला लागली आहे. लोकसभेत भाजपला सर्वांधीक मताधिक्य दिले. भाजपचे अस्तित्व चांगले आहे. भाजपकडेही सक्षम चेहरा आहे.
चोपडा मतदारसंघात लोकसभेत भाजपला प्रचंड मते मिळाली. असे असले तरी ही जागा शिवसेनेकडे असून गेल्या विधानसभेत १५ हजारांनी पराभव झाला होता. शिवसेनेचे संघटन चांगले असून उमेदवार निश्चित झाला आहे. लोकसभेमुळे भाजपचे चित्र सकारात्मक दिसते.

रावेरमध्ये भाजपची ताकद जास्त आहे. शिवसेनेने काही वर्षांत ताकद निर्माण केली असली तरी ती पुरेशी नाही. भुसावळ शिवसेनेचा बालेकि‍ल्ला मानला जातो. परंतु राष्ट्रवादीतून आलेल्या अनिल चौधरींमुळे भाजपला बळ मिळाले आहे. लोकसभेतही ५५ हजारांचे मताधिक्य होते. पाचोऱ्यात शिवसेनेची ताकद भाजपच्या तुलनेत अधिक आहे. शिवसेनेने लोकसभेत केलेल्या कामगिरीमुळे भाजपला ५९ हजारांचे मतािधक्य मिळाले. जामनेरमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. शिवसेना पूर्वीच्या तुलनेत कमजाेर झाली आहे. पाचोरा तालुक्याची गावे जाेडल्यामुळे सेनेचे अस्तित्व वाढले आहे.
एरंडाेलमध्ये शिवसेनेचा आमदार तर भाजपचा खासदार आहे. दोन्ही पारोळा तालुक्यातील रहिवासी आहेत. लोकसभेत भाजपचे मतािधक्य अन्य मतदारसंघांच्या तुलनेत कमी होते. तरी भाजपची ताकद आहेच. चाळीसगावमध्ये भाजपचे स्वतंत्र अस्तित्व आहे. शिवसेनाही काही प्रमाणात असली तरी भाजपच्या तुलनेत ताकद कमीच म्हणावी लागेल. परंतु पाचोरा व भडगाव तालुक्याशी जवळ असलेल्या गावांमध्ये सेना असल्याने परिणाम करणारी आहे.

मुक्ताईनगरमध्ये २५ वर्षांपासून भाजपचा आमदार असून शिवसेनेचा जिल्‍हाप्रमुख असल्याने ताकद वाढली आहे. त्यामुळे स्वतंत्र लढल्यास दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ताकद अजमावू शकतात.
अमळनेरमध्ये भाजपची ताकद अधिक आहे. परंतु विधानसभा निवडणूक मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे येण्यापूर्वी शिवसेनेची ताकद अधिक होती. आताही शिवसेना उमेदवार देण्याची तयारीत आहे. त्यामुळे निवडणूकीत कोणाची लाॅटरी लागते हे निवडणूकीनंतरच कळेल.
शिवसेनेच्या तुलनेत भाजप जवळपास ६० टक्क्यांनी पुढे
नरेंद्र सोनवणे/नीलेश भंडारी

धुळे - विधानसभेच्या पाच जागांपैकी सद्य:स्थितीत भाजपाने चार जागांवर आघाडी घेता येईल, अशी स्थिती निर्माण केली आहे. शिवसेनेच्या तुलनेत भाजप जवळपास ६० टक्क्यांनी पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष स्वबळावर लढले तर टक्केवारीच्या गणितात भाजपला संधी असेल, असे चित्र आहे. त्याच वेळी केवळ दोन जागांवर हक्क सांगणाऱ्या शिवसेनेचा टक्का त्यापुढे सरकलेला नाही. मात्र, लोकसभेत केवळ धुळे ग्रामीणने हात दिला. हे पाहता धुळे शहरबाबत सेनेचे नेते साशंक आहेत. भाजपशिवाय त्यांचे पारडे पुढे सरकणार नाही.
धुळे जिल्‍ह्यात विधानसभा मतदारसंघातील आढावा
धुळे शहर मतदारसंघात शिवसेनेला २५ वर्षांपासून उमेदवारीची संधी मिळतेय. मात्र, एकदाही जागा जिंकता आलेली नाही. २००९ च्या विधानसभेत सेनेचे गाेपाळ केले यांना १७ हजार ७७१ मते मिळाली होती. त्यापेक्षा बहुजन समाज पक्षाच्या साबीर शेख यांनी २५ हजार ३४० मते घेतली होती. राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांना ३० हजार ८३५ मते मिळाली. तर लोकसंग्राम पक्षाच्या अिनल गाेटे ५९ हजार ५७६ मते घेऊन निवडून आले. सेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर राहिला. त्याचवेळी भाजपच्या मतांचा टक्का इतरत्र वळल्याचे दिसून आले. लोकसभेत शहरमधून ९६४४२ मते भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांना मिळाली. शिवसेना व भाजपची युती असतानाही ही टक्केवारी कमी असल्याचे समजले जात आहे.

धुळे ग्रामीण मतदारसंघात कॉंग्रेसचे रोहिदास पाटील यांच्यापेक्षा वीस हजार जास्तीची मते घेऊन शिवसेनेचे शरद पाटील २००९मध्ये जिंकले होते. लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला एक लाख ३० हजार मते मिळाली. विधानसभेत मिळालेल्या मतांपेक्षा तीस हजार जास्तीच्या मते मोदी लाटेमुळे मिळाल्याचे दिसून येते. याचाच अर्थ शिवसेनेला दिलासा दिसत नाही.

शिंदखेडा मतदारसंघात विधानसभेत भाजपच्या जयकुमार रावल यांना जवळपास ५१ टक्के मते मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात यामध्ये घसरण झाल्याचे दिसून आले. विधानसभेत भाजप उमेदवाराला ८५ हजार ६५६ मते मिळाली होती तर कॉंग्रेस उमेदवाराला केवळ २० टक्के मते होती. त्यामुळे लोकसभेत मतांची आकडेवारी वाढू शकते, असा अंदाज होता. मात्र लोकसभेत भाजपच्या डॉ. भामरे यांना ९५ हजार ८५२ मते मिळाली. १० हजार मतांची वाढ यामध्ये दिसते.

साक्री मतदारसंघात २००९मध्ये भाजपच्या मंजुळा गावित यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यांना २७.४९ टक्के मते मिळाली होती. कॉंग्रेस उमेदवाराला ५७ ४५२ म्हणजे ४०.९९ टक्के मते मिळाली होती. भाजप उमेदवाराच्या मतांची संख्या ३८ ५९८ इतकी होती. त्याचवेळी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेत मात्र भाजपच्या नंदुरबारच्या खासदार डॉ. हीना गावित यांना ९१४९८ मते मिळाली. या मतांनी दुपटीची टक्केवारी गाठल्याचे पुढे येते. यात भाजप किमान वाटेवर तरी आहे. शिवसेनेला तेवढीही संधी असल्याचे दिसत नाही.

शिरपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवाराला ९२ हजार तर भाजपच्या उमेदवाराला ५२ हजार २७५ म्हणजे ३३.५३ टक्के मते होती. ती मते लोकसभा निवडणूकीदरम्यान वाढली. डॉ. हीना गावित यांना एक लाख ५९ हजार मते मिळाली. ही मतांची आकडेवारी दुपटीची आहे. त्यामुळे शिरपूरमध्ये भाजपने पुढाकाराची भूमिका घेतली तर काही बिघडणार नाही. कारण शिवसेनेची यात फारशी भर पडलेली दिसत नाही.
नंदुरबार जिल्‍ह्यात लढती गावित बंधू भोवती
रणजित राजपूत

नंदुरबार - विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोदी लाटेचा फायदा होईल का हे आगामी काळात कळेलच. दुसरीकडे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांतील लढती गावित बंधूंभोवती केंद्रित असतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचा ढासळत असलेला बुरूज सावरण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्वच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर येऊन ठेपली आहे.
नंदुरबार जिल्‍ह्यातील चित्र
नंदुरबार मतदारसंघात गेल्या िवधासभा निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावित यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती. दुसरीकडे काँग्रेसने भाजपच्या उमेदवार सुहासिनी नटावदकर यांना उघड पाठिंबा दिला होता. त्यानंतरही डॉ. गावित २३ हजार ८५८ मतांनी निवडून आले होते. दुसरीकडे लोकसभेत या मतदारसंघात भाजपाला ५० हजारांचे मताधिक्य मिळाले आहे.

अक्कलकुवा मतदारसंघात लोकसभेत भाजपाला ३८९९ मतांची आघाडी मिळाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल बघितला तर काँग्रेसचे अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना अपक्ष उमेदवार विजयसिंग पराडके यांच्यापेक्षा दोन हजार ५५९ इतकेच मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला अत्यल्प मते मिळाली होती.

शहादा मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड. पद‌्माकर वळवी यांना प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार उदयसिंग पाडवी यांच्यापेक्षा १२५८७ मते अधिक मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार लालसिंग वळवी यांना २९६५६ मते मिळाली होती. शिवसेनेचे उदयसिंग पाडवी यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी ही जागा भाजपला सोडण्याची मागणी आहे. तर राजेंद्र गावित हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. लोकसभेत भाजपला या मतदारसंघातून १४ हजार ६४२ मताधिक्य मिळाले होते.

नवापूर मतदारसंघातून विधानसभेत सपाचे शरद गावित विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी पाहता काँग्रेसला हा मतदारसंघ अनुकूल आहे.