आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील उलथापालथ अन‌् कदमबांडेंचा धक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - आमदार अनिल गोटे यांच्या वेगवान हालचालींमुळे राजकीय गणिते पुरती बिघडली आहेत. जिल्हा बॅंकेचा फास जोर कसपणे आवळला जात असल्याचे दिसताच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी यापुढील राजकारणाला रामराम ठोकण्याचा पवित्रा घेतला. तर शिवसेनेला सरळ पदांची नव्याने बांधणी करावी लागली.
चक्क दोन जिल्हाध्यक्ष नियुक्तीची वेळ सेनेवर आली. यातील महानगरप्रमुख पदासाठी कोणत्याही निष्ठावंताचा विचार झालेला नाही. तर नुकत्याच सेनेत आलेल्या सतीश महालेंना यासाठी पुढे केल्यामुळे सेनाही दोन तटात विभागली गेल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. या पक्षाकडे दणदणीत बहुमतही आहे. त्यामुळे विधानसभेत पराभव झाला तरी राष्ट्रवादी राजकारणाच्या रिंगणात दोन हात करीत काहीतरी नवी संकल्पना राबवेल, असा होरा होता. मात्र, राष्ट्रवादी पक्षासह पदाधिकाऱ्यांना वारंवार सावरणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांनीच राजकारणातून अंग काढून घेण्याची तयारी चालवली आहे. तरुणांच्या हाती सत्ता देण्यासाठी बाहेर होणार असल्याचे कदमबांडे यांचे मत असले तरी त्या मागील इंगित वेगळेच असल्याचे पुढे येत आहे.
मुळात राष्ट्रवादी पक्षाचे कर्तेधर्ते राज्य बॅंकेच्या प्रकरणात गळ्यापर्यंत अडकले आहेत. त्यात राजवर्धन कदमबांडे हे राज्य बॅंकेसह धुळे नंदुरबार जिल्हा बॅंकेच्या प्रकरणातही अडकलेले आहेत. आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा बॅंकेचा पंचनामा सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंतही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका योग्यरीत्या सुस्पष्ट केलेली नाही. त्यामुळे संभ्रम वाढत गेला. आता तर आमदार गोटे यांना त्यांच्याच पक्षाच्या सत्तेची साथ लाभत आहे. त्याचा ते राजकीय हितासाठी फायदा करून घेतीलच. बॅंकांच्या प्रकरणांचा ससेमिरा सुटावा म्हणून प्रयत्न झाले; पण ती बाब काही शक्य दिसत नाही. त्यामुळे शहरात एकहाती सत्ता असतानाही राष्ट्रवादी पक्ष त्याचे पदाधिकारी हतबल झालेले दिसतात.
सध्या महापालिकेच्या फायलींवरील धूळही झटकली जात आहे. गेल्या दहा वर्षांच्या सत्तेत बऱ्याच बाबी घडलेल्या आहेत. आतापर्यंत जकात, पारगमन शुल्कातून आलेल्या रकमेतून नेमकी काय कामे झाली, निविदांचा घोळ केव्हा कोणाच्या काळात झाला. अग्निकांडाची खरी कारणे काय आहेत, याचा शोध सध्या घेतला जात आहे. त्याचीही चिंता सत्ताधाऱ्यांपुढे राहणार आहे. त्यामुळे राजकारणाची प्यादी बदलायला सुरुवात झाली आहे.

मुळात राजकारणात कोणाला पुढे करायचे, कोणी मागे राहायचे, हा त्या प्रत्येक पक्षाचा प्रश्न असतो. मात्र, यालाही कारणे असतात. राष्ट्रवादीकडे असंतोषी असलेले सतीश महाले शिवसेनेत गेले. त्यांना त्याचे फळही मिळायला सुरुवात झाली आहे. महाले यांनी थेटपणे कदमबांडे यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे महाले यांची डोकेदुखी कदमबांडे यांना सतावत राहील.
आमदार गोटे यांच्या हालचाली वेगवान आहेत. त्यामुळे भाजप पक्षही शहरात बऱ्यापैकी हातपाय पसरवू शकतो, याचा धसका शिवसेनेसारख्या पक्षाने घेतला. मुळात हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असल्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करतीलच. त्यासाठीच संपूर्ण कार्यकारिणी बदलवण्यात आली. दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त झाले. महानगरातही तोडीस तोड देणारा प्रमुख दिला गेला. त्यामुळे सध्यातरी सेनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आमदार गोटेंची सक्रियता शिवसेनेतील धक्कादायक उलथापालथीमुळेच राष्ट्रवादी कदमबांडे यांना विचार करायला भाग पाडलेले दिसते.

मनपातील सत्तेचा जोर सोसरला

महापालिकेत गतवर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. मात्र, वर्ष सरण्यापूर्वीच सत्तेचा जोर सोसरला आहे. मुळात चांगल्या योजना मार्गी लागून नागरिकांना सुविधा मिळण्याची अपेक्षा असतानाच आता मनपात महापौर बदलाच्या घडामोडी सुरू होतील. सव्वा वर्षात काहीच करता येत नाही, ही खंत मात्र प्रत्येक माजी महापौराला राहील.
निष्ठावंतांना डावलल्याचे चित्र
शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्यांना डावलल्याची खंत एकीकडे व्यक्त होत आहे. मुळात रस्त्यावर उतरून शिवसेनला एक चेहरा ओळख मिळवून देणारी फळी आहे. त्याच माध्यमातून पदाधिकाऱ्यांची निवड झाली तर पक्षाची उतरंड कायम राहते. मात्र, या वेळी पदाधिकाऱ्यांची निवड करताना बाहेरच्यांना प्राधान्य दिल्याचे सेनेंतर्गत बोलले जात आहे. त्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात बरेच जुने चेहरे अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले.