आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत शिवसेनेच्‍या बैलगाडी मोर्चाने मुक्ताईनगर दणाणले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- तालुक्यातील शेतकरी, वीजग्राहक आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका शिवसेनेतर्फे शुक्रवारी (दि.17) तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. समस्या सोडवण्याबाबत अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील बोदवड चौफुलीवरून बैलगाडी मोर्चाला सुरुवात झाली. उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, तालुकाप्रमुख छोटू भोई, अशोक राणे, प्रमोद देशमुख, गोपाळ सोनवणे, अफसर खान, सुनील पाटील यांच्यासह तालुकाभरातील शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मोर्चात जवळपास 80 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकर्‍यांच्या घोषणांनी मुक्ताईनगर शहर दणाणल्याचा अनुभव शुक्रवारी शहरवासीयांनी घेतला. वीज वितरण कंपनीच्या वढोदा उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता सरोदे यांच्याविरुद्ध वीज ग्राहकांसह शेतकर्‍यांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. या बाबत मोर्चेकर्‍यांनी तहसीलदारांकडे समस्या मांडल्या. त्यानंतर तहसीलदारांनी वीज वितरणचे अभियंता सुहास जोशी, सहायक अभियंता अजय पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र, समस्या सोडवण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने आंदोलकांनी ठिय्या मांडण्याचा पावित्रा घेतला. याबाबत तहसीलदार अजितकुमार ठेंगे यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक शिंदे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्यांबाबत त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना कल्पना दिली.

भविष्यातही पाठपुरावा करणार
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर तहसीलदारांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून त्यांना तहसीलमध्ये बोलावले. यानंतर आंदोलकांनी अधिकार्‍यांसोबत चर्चा केली.

आंदोलकांच्या मागण्या अशा

  • रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर शेतकर्‍यांना तत्काळ रोहित्र मिळावे
  • विद्यार्थ्यांच्या परीक्षाकाळात भारनियमन केले जाऊ नये
  • निमखेडी, पूर्णाड उपकेंद्रात 5 मेगावॅट क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर
  • ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेतील त्रुटी दूर व्हाव्यात
  • रिडिंग ठेकेदारांवर वीज वितरणने नियंत्रण मिळवावे
  • सप्टेंबर अखेरच्या कृषी बिलातील अतिरिक्त आकार कमी करावा
  • नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जावी


भ्रमणध्वनीवरून चर्चा
शेतकर्‍यांच्या समस्यांबाबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक शिंदे यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. येत्या दोन दिवसात शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासह वढोदा उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता विनोद सरोदे यांची बदली केली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. मोर्चा तहसीलवर धडकल्यानंतर दोन तासांनी सहायक अभियंता पाटील यांनी आंदोलकांना समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शेतकर्‍यांसह विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शिवसेनेने आक्रमकपणे भूमिका मांडली. अधिकार्‍यांनी समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. समस्या सोडवण्यासाठी भविष्यातही पाठपुरावा सुरूच राहील. कार्यवाहीत दिरंगाई झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू. चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख