आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकबाकीदारांची दुकाने सील!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील दुकानदारांकडेही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर थकित आहे. याप्रकरणी अनेकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, वसुलीची कारवाई संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी वसुलीचा वेग वाढविणे गरजेचे असल्याने अतिरिक्त आयुक्त के. व्ही. धनाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, हेमलता डगळे, वसुलीप्रमुख काशीनाथ खंदरकर व निरीक्षक, कर्मचारी आदींच्या पथकाने सोमवारी सायंकाळी आग्रा रस्त्यावरील थकबाकीदार दुकानदारांकडे वसुलीची धडक कारवाई केली.

या वेळी महात्मा गांधी चौकापासून सुरुवात करण्यात आली. त्यातील थकित घरपट्टी वसुली केली. या वेळी काहींनी जागेवर पैसे भरून दिले तर काहींनी धनादेश जमा केले. मात्र, ज्या दुकानदारांनी थकित रक्कम दिली नाही, अशा दुकानदारांची दुकाने या वेळी महापालिकेतर्फे सील करण्यात आली. दुपारी 4 वाजेनंतर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक वाहनामधून आग्रा रस्त्यावर आल्यानंतर थकबाकीदारांकडे गेले. तसेच दुकाने सील केली. या कारवाईमुळे आग्रा रस्त्यावरील व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातील काही व्यापा-यांनी पैसे देतो ; पण एक दिवस कारवाई टाळा, असे सांगितले. तर काही दुकानदारांनी अधिका-यांना दूरध्वनी करून पथकातील कर्मचा-यांना परत बोलावून घ्या, असे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
दोन लाख रुपयांची वसुली
महापालिकेतर्फे आग्रा रस्त्यावरील थकबाकीदार दुकानदारांकडे वसुलीची कारवाई राबविण्यात आली. आग्रा रस्ता ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. त्यातील अनेकांकडे घरपट्टी थकित आहे. त्यात वसुली मोहीम राबविण्यात येऊन सोमवारी दोन लाख रुपये वसूल करण्यात आले. ज्यांच्या दुकाने किंवा मालमत्तांवर कारवाई होईल. त्या वेळी तातडीची रक्कम भरली जाईल. त्यातून मनपाच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल; परंतु ही कारवाई नियमित झाली पाहिजे. तरच त्यापासून उत्पन्न मिळेल. अन्यथा मध्येच थांबवलेली कारवाई पुन्हा रखडण्याची भीती आहे.

थकीत मालमत्ताधारकांना होणार दंडाची आकारणी
थकित मालमत्ताधारक आणि अनधिकृत बांधकामांची तपासणी महापालिकेतर्फे मालमत्ता तपासणी मोहीम राबवून करण्यात येत आहे. त्यात अनेक बांधकामे अनधिकृत असल्याचे तसेच थकबाकीदारही मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. काहींना नोटीसही देण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. दंड किती पटीत करायचा हा विषय महासभेत येणार आहे.

25 दुकाने केली सील
महापालिकेची वसुली मोहीम धडाक्यात सुरू करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सोमवारी वसुलीची कारवाई करण्यात आली. त्यात आग्रा रस्त्यावरील 25 थकबाकीदारांची दुकाने पथकाने सील केली. यात लीला व्यापारी संकुलातील दुकानांचा समावेश आहे. त्यांच्याकडे चार लाख 32 हजार रुपयांची थकबाकी होती.

कोट्यवधी रुपये अडकले
० नळपट्टी व घरपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला मिळणारे कोट्यवधी रुपये वसुलीअभावी अडकले.
० जकात व पारगमन शुल्काच्या रकमेमुळे आतापर्यंत मनपा प्रशासनाचेही या रकमेकडे झाले होते दुर्लक्ष.
० वॉर्डांमध्ये थेट घरनिहाय वसुलीसाठी यंत्रणा राबविली नसल्यामुळे नागरिकांनीही केला नाही भरणा.
० नगरसेवकांच्या दबावाखाली काही वॉर्डात यंत्रणा राबल्याने केवळ वसुलीच्या पावत्या देऊन सुटका.
० शहरात मोठ्या आस्थापनांकडे अडकलेली रक्कम काढण्यासाठी पथकालाही करावी लागेल कसरत.