आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी, ऐन हिवाळ्यात टंचाई संकट, भुसावळ पालिकेच्या बंधाऱ्याची जलपातळी घटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तापी नदीपात्रातील पालिकेच्या बंधाऱ्याची जलपातळी खालावल्याने उन्हाळ्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे - Divya Marathi
तापी नदीपात्रातील पालिकेच्या बंधाऱ्याची जलपातळी खालावल्याने उन्हाळ्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे
भुसावळ - पावसाळासंपत नाही तोच शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. पावसाळ्यात ओसंडून वाहणाऱ्या पालिकेच्या बंधाऱ्यातील जलपातळी तब्बल २५ सेंटिमीटरने कमी झाली असून, मोठ्या बंधाऱ्यातील राखीव जलसाठ्याचा वापर करावा लागत आहे. यामुळे हिवाळ्यातच हतनूर धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली जाणार आहे. पालिकेतील नव्या सत्ताधाऱ्यांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास आगामी उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण होईल, असे संकेत दिसून येत आहेत.
तापीचे विस्तीर्ण पात्र आणि हतनूर धरणात राखीव जलसाठा यामुळे शहर पाण्याच्या बाबतीत संपन्न आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून केवळ पालिकेचे नियोजन नसल्याने तसेच शहरातील जलशुद्धीकरण यंत्रणा कालबाह्य झाल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या उन्हाळ्यात तर शहराला हतनूर धरणातून वेळेवर आवर्तन मिळाल्याने दोन वेळा रॉ वॉटर यंत्रणा बंद करण्याची नामुष्की सहन करावी लागली. शहरात तापीपात्रात, रेल्वेची मालकी असलेल्या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या हिवाळ्याच्या काळातच खालच्या बंधाऱ्यातील जलपातळी २५ सेंटिमीटरने कमी झाली आहे, तर वरच्या मोठ्या बंधाऱ्यातील पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे. शहर आणि रेल्वेला हा साठा आता केवळ १५ ते १८ दिवस पुरेल, असा अंदाज आहे. यामुळे पालिका प्रशासनावर आता हतनूर धरणातून हिवाळ्यातच आवर्तन मागवण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या खालील बंधाऱ्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात हा बंधारा तापीला पूर आल्यानंतर ओसंडून वाहतो. मात्र, शहराला केवळ २८ दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी त्यात साठवता येते. यामुळे आता हिवाळ्यात या बंधाऱ्याची जलपातळी घटली आहे. सध्या शहरात यामुळे टंचाईची भीती निर्माण झाली आहे. अद्यापही किमान १५ दिवस पुरेल इतके पाणी बंधाऱ्यात कायम आहे. याचदरम्यान पालिका प्रशासनाकडून हतनूरमधून पाण्याचे आवर्तन मागवले जाणार आहे. यामुळे तूर्त टंचाई जाणवणार नसली तरी, हा प्रकार आगामी उन्हाळ्यातील टंचाईच्या पाऊलखुणा म्हणून ओळखला जात आहे. पालिकेतील नवीन सत्ताधारी असलेल्या भाजपला आता उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही यासाठी आतापासूनच योग्य नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.

-तापी नदीपात्रातीलबंधाऱ्याची जलपातळी घटली असली तरी, आजच शहरावर पाण्याचे सावट आलेले नाही. हतनूरमधून आवर्तन मागवून बंधाऱ्याची पातळी कायम राखली जाईल. पालिकेचा हतनूरमध्ये राखीव साठा आहे. आगामी उन्हाळ्यातही शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, याचे नियोजन पालिका प्रशासनाने आतापासूनच सुरू केले आहे.
-बी. टी.बाविस्कर, मुख्याधिकारी, भुसावळ

‘अमृत’ योजनेसाठी प्रयत्न हवे
शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ‘अमृत’ योजना राबवली जाणार आहे. या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून करण्यात येईल. शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेची नितांत गरज आहे. यामुळे आता या योजनेच्या कामाला गती दिली जाणार आहे. लवकरच ही योजना शहरात राबवणार असल्याचीही माहिती मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

हतनूरमधून थेट उचल
पालिकेचा हतनूर धरणात वार्षिक जलसाठा आहे. पालिका प्रशासनाकडून हा साठा थेट धरणातून उचलला जाऊ शकतो. मात्र, पालिका प्रशासनाची पाइपलाइन नसल्याने नदीपात्रात विसर्ग करून बंधाऱ्यात पाणी साठवून त्याची उचल केली जाते. यामुळे आगामी काळात पालिका प्रशासन थेट हतनूरवरून पाणी उचलण्यासाठी नियोजन करणार आहे. मात्र, शेळगाव बॅरेजमुळे शहरापर्यंत बॅकवॉटर राहणार असल्याने याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार आहे. .
बातम्या आणखी आहेत...