आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Showering Gulal On Four Worship Place Increase Tension

चार प्रार्थनास्थळांवर गुलाल फेकल्याने पारोळ्यात तणाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा (जि. जळगाव) - चार प्रार्थनास्थळांवर अज्ञात समाजकंटकाने मंगळवारी रात्री गुलाल फेकल्यामुळे बुधवारी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी भेट देऊन शहरात बंदोबस्त वाढवला आहे. तसेच नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.

सरफराजखॉँ सलावतखॉँ बेलदार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले आहे की, शहरातील बेलदार मोहल्ला भागातील मशिदीत मंगळवारी रात्री 10 वाजेची नमाज पठण होऊन दरवाजे व खिडक्या बंद करण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी 6 वाजता नमाजसाठी ते आले असता प्रार्थनास्थळाजवळ मोठा जनसमुदाय दिसला. त्यांनी विचारणा केली असता कोणी तरी रात्री प्रार्थनास्थळावर गुलाल फेकल्याचे सांगण्यात आले. समाजबांधवांच्या मदतीने त्यांनी या ठिकाणी साफसफाई केली. त्याबरोबरच शहरातील जामा मशीद, बडा मोहल्ला मशीदसह ओतारी गल्ली भागातील प्रार्थनास्थळावरही रात्री गुलाल टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे शेकडो समाजबांधवांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकाविरुद्ध कलम 295 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

संयमाचे कौतुक
या घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिता पाटील शहरात दाखल झाल्या. त्यांनी पोलिस अधिका-यांसह, तहसीलदार व सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन शांततेचे आवाहन केले. तसेच समाजबांधवांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कौतुक केले. पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनीही शांतता समितीची बैठक घेतली तसेच मुस्लिम समाजबांधवांशी चर्चा करून आरोपीला पकडण्याचे आश्वासन दिले.