आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या संस्थेची चौकशी; पोलिस गटशिक्षणाधिकार्‍यांच्या मागावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- भुसावळच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यावर गुरुवारी रात्री गणवेश घोटाळाप्रकरणी 29 लाख 56 हजार 400 रुपये अपहाराचा गुन्हा दाखल झाला. यानंतर शुक्रवारी चव्हाण कार्यालयाकडे फिरकल्याच नाहीत. त्यांनी रजेचा कोणताही अर्ज दिलेला नव्हता. दुसरीकडे पोलिसांनी औरंगाबादच्या श्रद्धा महिला विकास मंडळाच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे.

पारोळा आणि चाळीसगावच्या गटशिक्षणाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होवूनही भुसावळात हालचाली नव्हत्या. थेट मंत्रालयीन पातळीवरून अभय असल्याने चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, गुरुवारी (दि.7) अचानक जिल्हा परिषदेचे कायदेविषयक सल्लागार अँड.अनिल नेमाडे पंचायत समितीमध्ये धडकले. त्यांनी गटविकास अधिकारी डॉ.आर.पी.तायडे यांची भेट घेत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

29 लाख 56 हजार रुपयांच्या गणवेश घोटाळ्याचे तपासाधिकारी तथा सहायक निरीक्षक रवींद्र मानकर यांनी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली. आरोप असलेल्या गटशिक्षणाधिकारी चव्हाण शुक्रवारी कार्यालयात आल्या होत्या का? याची माहिती पोलिसांनी घेतली. मात्र, चव्हाण कार्यालयाकडे फिरकल्या नाहीत. त्यांनी रजेचा अर्जसुद्धा दिलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी तायडे यांच्याकडे चौकशी केली. त्यामुळे तायडे यांनीही चव्हाण यांच्या उपस्थितीबद्दल खातरजमा केली.

दरम्यान, गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी औरंगाबाद येथील र्शद्धा महिला विकास मंडळासोबत संगनमत करून गणवेशाच्या कापडाची परस्पर विक्री केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिस औरंगाबादच्या या मंडळाची चौकशी करणार आहेत. या मंडळाने कोणत्या व्यापार्‍यांना कापड विकले? ही माहिती काढण्यात येईल. चोरी करणे, चोरीला सहकार्य करण्याच्या सबबीवरून र्शद्धा महिला विकास मंडळ घोटाळ्याच्या फेर्‍यात अडकणार आहेत.

मुख्याध्यापकांनी घेतला मोकळा श्वास
भुसावळ तालुक्यात गणवेश घोटाळा उघड होताच खळबळ उडाली. मात्र, गटशिक्षणाधिकारी चव्हाण यांनी हात झटकून ‘घोटाळ्या’शी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. धनादेश मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे आहेत, याकडे चव्हाण यांचा रोख होता. यानंतर शिक्षक संघटना मुख्याध्यापकांच्या बाजूने उभ्या राहिल्या. वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, जिल्हास्तरीय समितीच्या चौकशीत गणवेश घोटाळ्याचे खापर गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या माथ्यावरच फुटले. गुरुवारी रात्री 29 लाख 56 हजार 400 रुपये अपहाराचा गुन्हा दाखल झाला. यामुळे मुख्याध्यापकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

चव्हाण यांना मंत्रालयस्तरावरून पाठबळ?
यापूर्वीच अहवाल आलेला असताना केवळ चव्हाण यांच्यामागे मंत्रालयस्तरावरून पाठबळ असल्याने गुन्हा दाखल होण्यास दिरंगाई झाली. प्रसंगी कापड निकृष्ट की बदलला याबाबत प्रयोगशाळेच्या अहवालाची आणि नंतर अपहार नेमका किती रकमेचा? याबाबत काथ्याकूट झाला. गुरुवारी मात्र जिल्हा परिषदेचे कायदेशीर सल्लागार अँड.नेमाडे यांनी सर्व कायदेशीर पूर्तता करून पंचायत समिती गाठली. यानंतर गटविकास अधिकारी डॉ.तायडे यांनी शहर पोलिस ठाण्यात चव्हाण यांच्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळे पडद्याआडून हालचाली करणारे अजून काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, सारी मदार तपासाच्या दिशेवर अवलंबून आहे.

आधी जबाब नोंदवून घेणार
गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, यासाठी बारकावे तपासून पाहू. आरोपीच्या तपासासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात येईल. या प्रकरणाशी संबंधितांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे.
-रवींद्र मानकर, गणवेश घोटाळ्याचे तपासाधिकारी

रजेचा अर्ज मिळाला नाही
पोलिसांकडून गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्याबाबत विचारणा झाली होती. मात्र, पंचायत समितीप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात त्यांच्या रजेचा अर्ज नाही. सोमवारपासून दुसर्‍या अधिकार्‍याकडे पदभार सोपवण्याची सूचना शिक्षणाधिकार्‍यांनी केली आहे.
- डॉ. आर.पी. तायडे, गटविकास अधिकारी, भुसावळ


केवळ तोंडी आदेशाचे पालन
गणवेश घोटाळ्यात तालुक्यातील मुख्याध्यापकांना निष्कारण गोवले जात आहे. त्यांनी केवळ तालुकास्तरावरून मिळालेल्या तोंडी आदेशाचे पालन केले होते. मुख्याध्यापक निदरेष असून सखोल तपास केल्यास खर्‍या गुन्हेगारांचा चेहरा समोर येईल.
-गणेश फेगडे, तालुकाध्यक्ष, शिक्षक परिषद संघ, भुसावळ

आम्ही सर्वजण अंधारात होतो
शालेय गणवेश वाटपासंदर्भात कोणत्याही लेखी आदेशाची प्रत मिळाली नव्हती. केंद्रप्रमुखांनी भ्रमणध्वनीवरून तालुक्याच्या गट साधन केंद्रात बोलावले होते. याठिकाणी कोणतीही माहिती न देता आमच्याकडून गणवेशाचे धनादेश घेण्यात आले होते. घोटाळ्याशी आमचा काहीही संबंध नाही.
-वैशाली पाटील, मुख्याध्यापक, वरणगाव