आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांचे आज धुळे शहरात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत उद्या बुधवारपासून दोन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली असून महासत्संगासाठी चारशे बाय चारशे फुटाचा भव्य मंडप टाकण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या प्रचारार्थ शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे विविध उपक्रमांतून अध्यात्माची ओळख करून दिली जाते. वसुधैव कुटुम्बकम् या सूत्रानुसार कार्य सुरू आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या येथील शाखेतर्फे श्री श्री रविशंकर यांच्या सान्निध्यात प्रथमच महासत्संग होणार आहे. त्यासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आदी ठिकाणाहून शिष्य उपस्थित राहणार आहेत.
भव्य व्यासपीठ - महासत्संगासाठी गोशाळेच्या मैदानावर भव्य मंडपासह शंभर बाय साठ फुटाचे भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहे. या व्यासपीठाची उंची जमिनीपासून आठ फूट असून श्री श्री रविशंकर यांची आसन व्यवस्थाही जमिनीपासून 12 फूट उंचावर करण्यात आलेली आहे. व्यासपीठाच्या पाठीमागे आर्ट ऑफ लिव्हिंगचे चिन्ह आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी वारली चित्रे रंगविण्यात आली आहेत.
प्रचारार्थ रॅली - कार्यक्रमासाठी गेल्या महिन्यापासून तयारी सुरू आहे. गोशाळा मैदानावर काटेरी झाडे काढणे, सपाटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना कार्यक्रमाची माहिती व्हावी यासाठी शहरात ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. देवपुरातील नेहरू चौकातही संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रचारार्थ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी काल सोमवारी सायंकाळी शहरातून मोटारसायकल रॅली काढून वातावरण निर्मिती केली. नेताजी कॉलनीतील मैदानातून रॅलीला सुरुवात झाली. तिचा गोशाळा मैदानावर समारोप झाला.
विमानाने गुरुजींचे आगमन - सोलापूर येथील कार्यक्रमानंतर खास विमानाने श्री श्री रविशंकर दुपारी एकला गोंदूर विमानतळावर येतील. तेथून ते खासगी वाहनातून वाडीभोकर रोड, जयहिंद महाविद्यालय, गणपती पूल, संतोषीमाता मंदिर, जिल्हा रुग्णालय मार्गे ममता गिंदोडिया यांच्या निवासस्थानी जातील. तेथेच त्यांचा मुक्काम असेल.
दीड लाख उपस्थितीची अपेक्षा - महासत्संगास धुळ्यासह परिसरातून दीड ते दोन लाख नागरिक उपस्थित असतील, असे संयोजकांनी सांगितले. त्यानुसार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातही निमंत्रितांसाठी विशेष बैठक व्यवस्था क रण्यावर भर देण्यात आला आहे. ऐनवेळी अधिक गर्दी झाल्यास पर्यायी बैठक व्यवस्था करण्याची तयारी संयोजकांनी केली आहे.
वाहतुकीच्या मार्गात बदल - महासत्संगाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव रोडवरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. शहरातून गोशाळा मैदान, दसेरा मैदान, मालेगाव रस्त्याकडे जाणा-या वाहनचालकांनी रेल्वेस्थानक, 80 फुटी रोड, अग्रसेन पुतळा, लोकमान्य हॉस्पिटलमार्गे, चाळीसगाव चौफुली मार्गाचा वापर करावा, अग्रसेन चौक ते गोशाळा मैदान, दसेरा मैदान, मालेगाव रोडकडे जाऊ इच्छिणा-या वाहनचालकांनी लोकमान्य हॉस्पिटलमार्गे चाळीसगाव चौफुली मार्गाचा वापर करावा, मालेगावहून गुरुद्वारामार्गे शहराकडे येणा-या वाहनचालकांनी चाळीसगाव चौफुली, लोकमान्य हॉस्पिटल या मार्गासह सुरत बायपास, चितोड नाका, चितोड रोड, फाशी पुलाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी केले आहे.