आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्म घटले अन् भ्रष्टाचार वाढला - श्री श्री रविशंकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - संतांच्या काळात देशातील जनता अध्यात्माकडे वळली होती. त्या वेळी गरिबीचे चित्र कुठेच दिसत नव्हते. त्यापाठोपाठ इंग्रज आले. त्यांनीही भारताला संपन्न, सुखी देशाची मान्यता दिली होती. त्यांचेही असे म्हणणे होते की, अख्खा भारत देश फिरलो पण भिकारी दिसला नाही. याचाच अर्थ गेल्या काही वर्षांत देशात अध्यात्म कमी झाल्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे, असे विचार आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी महासत्संगातून मांडले.
मालेगाव रोडवरील गोशाळा मैदानात महासत्संगाचे आयोजन बुधवारी सायंकाळी करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री श्री रविशंकर यांचे भक्तीमय वातावरणात आगमन झाले. भव्यदिव्य व्यासपीठावर वारकरी संप्रदायासह हिंदू, मुस्लिम, शीख धर्मातील गुरूंची उपस्थिती होती. रविशंकर यांनी रॅमवरून येत भाविकांना जवळून दर्शन दिले. विठ्ठलनामाच्या स्मरणात भाविकांना त्यांनी तल्लीन केले. गोड भजनानंतर रविशंकर यांनी भाविकांशी संवाद साधला. त्यांनी सर्वांना प्रसन्न राहण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, तांदूळ, कडधान्य पाण्यात न भिजवता खाणे कठीण असते; पण तेच धान्य पाण्यात भिजवून ठेवले तर ते मऊ, मुलायम होते.
अध्यात्माचेही तसेच असते. कणखर, कठोर स्वभावाचा माणूसही संतांचा संग, अध्यात्म आणि कीर्तनातून मऊ मुलायम होतो, एवढी ताकद अध्यात्मात आहे. देवाचे अस्तित्व हे आपल्या हृदयात आहे. कुणी म्हणतं मला देव कुठेच दिसत नाही; पण मला देवाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. समोर असणा-या प्रत्येकात देव आहे. देव हे आजकालचे अस्तित्व नाही, ते सदैव आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी अध्यात्माचा मार्ग पत्करा. देवाचे अस्तित्व जाणवायला लागेल. आपणास मन:शांती मिळेल. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मोबाइल जसा सीमकार्ड, चार्जिंग आणि नेटवर्कशिवाय चालू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे जीवनात विश्वास, साधना आणि सेवा असावी लागते. अध्यात्माकडे जेव्हा देशातील नागरिक वळला तेव्हा भ्रष्टाचाराला थारा नव्हता; पण भौतिक सुखाच्या नादी लागून लोक भ्रष्ट मार्गाने पैसा कमवू लागले, तेव्हा अध्यात्म कमी होऊ लागल्याचे सांगत श्री श्री रविशंकर यांनी अध्यात्माचा मार्गच सर्वांना सुखी ठेवेल, असे सांगितले.
बहादूरवाडी झाले आदर्श गाव - आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बहादूरवाडी हे आदिवासीबहूल गाव आदर्श करण्यात आल्याची माहिती महासत्संगात देण्यात आली. गावात स्वातंत्र्यानंतर 63 वर्षांनी एसटी सुरू करण्यात आली. गावातील 1800 एकर जमीन केवळ सात व्यक्तींच्या नावावर होती. अधिका-यांनी गावात येऊन ती जमीन कोणतेही पैसे न घेता 92 व्यक्तींच्या नावावर केली. तसेच गावातील सर्वांना गावातच जातीचे दाखले बनवून देण्यात आले. सहा सामूहिक शेततळे, 141 दगडी बांध लोकसहभागातून बांधण्यात आले. याठिकाणी उभारण्यात आलेले ध्यान मंदिराचे लोकार्पण गुरुदेव यांच्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा याप्रसंगी साधकांनी व्यक्त केली.
दारूचे दुकान नाही ना? - बहादूरवाडी गावाच्या कायापालट केल्याची माहिती साधकांनी दिल्यानंतर गुरुदेवांनी गावात दारूचे तर दुकान नाही ना? असा प्रतिप्रश्न विचारला. कारण गावाचा विकास झाला असला तरी गावात दारूचे दुकान असेल तर सर्व नष्ट होईल, असेही गुरुदेवांनी सांगितले. बहादूरवाडी सारखीच आणखी 100 गावे तयार करा.
लग्न कोणाशी करू? सुंदर की बुद्धिमान मुलीशी - महासत्संगाच्या कार्यक्रमात प्रश्नोत्तराचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी एका युवकाने गुरुदेवांना लग्न सुंदर मुलीशी करू की बुद्धिमान असा प्रश्न विचारला. त्या वेळी गुरुदेवांनी सुंदरता व बुद्धिमत्ता एकत्र नसते का? असा प्रश्न उपस्थित करीत, बुद्धिमान मुलीशी विवाह करण्याचा सल्ला दिला. कारण बुद्धिमत्ता निर्माण होते तर सुंदरता येत-जात राहते. एखादवेळा सुंदरता, बुद्धिमत्ता दोन्ही एकत्रही मिळू शकतात, असे गुरुदेवांनी सांगितले.