आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळच्या शुभम चौधरीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळच्या शुभम चौधरी या विद्यार्थ्याने जीव धोक्यात घालून पेटत्या ओम्नीतील दोन विद्यार्थिनींचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाबद्दल भारत सरकारच्या नवी दिल्ली येथील भारतीय बालकल्याण परिषदेने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे. प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर 11 ऑगस्ट 2012 रोजी ओम्नी (क्रमांक एमएच 22 डी 1242) या गाडीने पेट घेतला होता. त्यात बसलेल्या दोन शाळकरी चिमुकल्या विद्यार्थिनी बसलेल्या होत्या. ही बाब नाहाटा महाविद्यालयाकडून घराकडे परतणारा शुभम संतोष चौधरी या विद्यार्थ्याच्या लक्षात येताच, त्याने पेटत्या ओम्नीच्या काचा फोडून दोघा विद्यार्थिनींचा जीव वाचवला होता. चिमुकल्या विद्यार्थिनींचा जीव शुभम चौधरी या धाडसी बालकामुळेच वाचला हे ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम समाजासमोर आणले होते. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी ‘धाडसाबद्दल शुभमला मिळावे शौर्य पदक’ असे वृत्त प्रकाशित केले होते. एवढेच नव्हे, तर इतरांनीही आदर्श घ्यावा, म्हणून ‘दिव्य मराठी’ने 14 ऑगस्ट 2012 रोजी त्याचा सत्कारही केला होता. यानंतर महाराष्ट्र राज्य बालकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी शुभमला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा केला. दरम्यान, गेल्या आठवड्यात मुंबई येथील महाराष्ट्र बालकल्याण समितीकडून सुचवण्यात आलेल्या नावांमध्ये शुभमची निवड झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्याच्या नावाची घोषणा होणार आहे. सोमवारी मुंबईत शुभमची पडताळणी करण्यात आली.
धाडसाचे मोल कळले
पेटत्या ओम्नीतून दोन विद्यार्थिनींना वाचवले तेव्हा खूप आनंद झाला होता. मात्र, माझे धाडस समाजासमोर आणण्याचा प्रथम प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला. चंद्रकांत चौधरी, स्वप्निल चौधरी यांनी पाठपुरावा केल्यानंतर राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 14 जानेवारीला आम्ही राज्यातील पाचही पुरस्कार विजेते दिल्लीला रवाना होऊ. शुभम चौधरी, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता, भुसावळ