आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बॉम्बस्फोट; संशयित आसिफला न्याय मिळण्यासाठी जळगावात स्वाक्षरी मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुंबईत सन २००६ मध्ये लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात फाशी झालेला संशयित आसिफ खान बशीर खान याला न्याय मिळावा, यासाठी जळगाव शहरात त्याच्या नातेवाइकांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. असिफ खानला जळगावातील सिमीविरोधातील खटल्यात १० वर्षे कैदेची शिक्षाही झाली आहे. गेल्या महिन्यात २१ जुलैपासून ही मोहीम सुरू असून मेहरूण परिसरातील अक्सा मशिदीबाहेर दर शुक्रवारी ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाते. यात गोळा झालेल्या स्वाक्षऱ्या आणि अभिप्रायाचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. 
 
आसिफसह सिमीचे अन्य काही संशयित सध्या वेगवेगळ्या कारागृहांमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांनी न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संशयितांच्या नातेवाइकांनी आता परिसरांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. २१ जुलै २०१७ पासून शहरातील मेहरूण भागातील अक्सा मशिदीबाहेर दर शुक्रवारी आसिफचे नातेवाईक ही मोहीम राबवत आहेत. या मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत दोन हजार नागरिकांनी आसिफ याच्याबद्दल अभिप्राय स्वाक्षरी नोंदवली आहे. आसिफ हा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेला तरुण आहे. तो अभियंता असून सिमीच्या किंवा अन्य देशविघातक कृत्यांमध्ये तो सहभागी नव्हता. त्याच्यावर खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. अशा आशयाचा अभिप्राय त्यावर स्वाक्षरी करण्यात येत आहे. दरम्यान, या अभिप्रायांचे एक प्रतिज्ञापत्र तयार करून ते आसिफच्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. 
 
पुण्यातही मोहीम सुरू 
जळगाव पाठोपाठ रविवारपासून पुण्यात देखील अशा प्रकारची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जास्तीत-जास्त सह्यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर करण्याच्या उद्देशाने या मोहिमेला मोठ्या शहरांमध्येही सुरुवात होते आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

याच काळात जळगाव शहरातदेखील सिमीचे नेटवर्क उघडकीस आले होते. नागपूर शहरातील बडकस चौकातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी जळगावातील सिमीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग उघडकीस अाला होता. हा खटलादेखील जळगाव जिल्हा न्यायालयात चालला. देश विघातक कृत्यात कट रचल्याच्या प्रकरणातील खटल्यातदेखील आसिफ खान याला १० वर्षे कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 
सन २००६ मध्ये मुंबईत लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. ७-११ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या घटनेत जळगाव शहरात राहणारा आसिफ खान याचा सहभाग आढळून आला. सत्र न्यायालयाने आसिफसह काही संशयितांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 
 
न्यायासाठी आमचा लढा 
देशविघातक कृत्य केल्याच्या खोट्या आरोपात आसिफसह काही जणांना अडकवले गेले आहे. यातून काही जण निर्दाेष झाले. आसिफही निर्दाेष आहे. आम्ही स्वाक्षरी मोहिमेत गोळा होणारे सह्यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयापुढे सादर करणार आहोत. आम्ही न्याय मागतो आहोत. 
- मुजफ्फर खान, आसिफचे मामा 
 
पुरावे, साक्षींवर न्यायालयांचे कामकाज 
न्यायालयासमोर येणारे पुरावे साक्षीदारांनी दिलेल्या साक्षींवर कोणत्याही न्यायालयाचे कामकाज अवलंबून असते. अशा प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांचा न्यायालयीन कामकाजात काहीच अर्थ नसतो. जळगावातील खटल्यातही आम्ही अचूक पुरावे साक्षींनुसार खटला चालवला. त्यात तथ्य असल्यामुळे न्यायालयाने संशयितांना शिक्षा सुनावली. 
- अॅड. केतनढाके, जिल्हा सरकारी वकील 

तीन खटल्यात दोषी, एकात निर्दोष 
मालेगाव येथील बॉम्बस्फोटातही आसिफचा सहभाग असल्याचे दोषारोप दाखल झाले होते. त्या खटल्यातून त्याची निर्दाेष मुक्तता झाली आहे. अशा प्रकारे एकूण तीन खटल्यांपैकी आसिफ दोघांत दोषी तर एका खटल्यात निर्दाेष ठरला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...