आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ शहरात सायलेंट झोनमध्ये ध्वनीप्रदूषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी शासनाने उत्सव काळात डीजे वाजवण्यावर बंदी आणली आहे. मात्र, वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नवर प्रशासनाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. या मुळे शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसराला म्हणजेच ‘सायलेंट झोनला’ ध्वनी प्रदूषणाचा विळखा पडला आहे.

चारचाकी आणि दुचाकींची संख्या वाढल्याने शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. बसस्थानक परिसर, लोखंडी पूल, हंबर्डीकर चौक, यावल रोड, मामाजी टॉकीज परिसर, जळगाव रोड, पांडुरंग टॉकीज, जामनेर रोड, मॉडर्न रोड, मुख्य बाजारपेठ, मरीमाता मंदिर रोड, पालिका कार्यालय आदी भागांत हे चित्र दिसते. कोंडीत सापडलेले वाहनचालक मार्ग काढण्यासाठी हॉर्न वाजवतात. परिणामी शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालय असलेल्या ‘सायलेंट झोन’मध्ये नियमांचे उल्लंघन होते. यावर कारवाई होत नाही. परिणामी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.

आवाजाची मर्यादा
70 डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेच्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषण होते. या मुळे वाहनांना 70 डेसिबलपेक्षा कमी तीव्रतेच्या आवाजाचे हॉर्न बसवण्याचा नियम आहे. मात्र वाहनधारक या नियमाचे सर्रास उल्लंघन करतात.

ध्वनीमापक यंत्र हवे
ध्वनी प्रदूषण करणार्‍यांना अटकाव घालण्यासाठी ध्वनीमापक यंत्र आवश्यक आहे. यंत्र उपलब्ध नसल्याने वाहनधारकांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
-सतीश जाधव, एपीआय, वाहतूक शाखा