आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिंगल फादर’ सागर रेड्डी जळगावात शोधतोय दाते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आई-वडिलांचा आश्रय नसल्याने बालपण अनाथाश्रमात घालवणार्‍यांना ते सज्ञान झाल्यानंतर म्हणजेच वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर नियमानुसार आश्रम सोडून जावे लागते. त्यामुळे समाजाने टाकून दिलेल्या या मुलांची स्थिती अत्यंत बिकट होते. तसे होऊ नये यासाठी प्रत्येक जिल्ह्यात यूथ होस्टेलची निर्मिती करण्याचा ध्यास 236 जणांचा ‘सिंगल फादर’ अशी ओळख निर्माण करणारा सागर रेड्डी बाळगून आहे. त्यासाठी तीन दिवसांपासून जळगावात येऊन तो दात्यांचा शोध घेतो आहे.

अनाथांना ओळख मिळावी यासाठी
अठरा वर्षाचा झाला म्हणून अनाथ आश्रमात राहता येणार नाही या नियमामुळे अनेक हुशार पण अनाथ मुलांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. राज्यभरात 1708 संस्था असून दरवर्षी सात ते आठ हजार मुले बाहेर पडत असतात. अशा मुलांना अनाथ आहेत म्हणून ओळखपत्र, रेशनकार्ड तसेच मतदानाचा अधिकार मिळत नाही. तरुण मुलींची अवस्था तर आणखीनच बिकट होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ‘यूथ होस्टेल’ सुरू झाल्यास अनाथांना हक्काचे घर उपलब्ध होऊन स्वत:ची ओळख निर्माण होऊ शकेल, या विचारातून सागर आता राज्यभर हिंडत असून मदतीचा हात देण्याची आग्रही विनंती करीत आहे.

जळगावात ‘भरारी’ संस्थेचा पुढाकार
‘अनाथांचा सिंगल फादर’ या पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या सागरच्या जळगावातील आगमनानंतर बालगंधर्व नाट्यगृहासमोरील दीपक परदेशी या तरुणाने या कार्यात उडी घेतली आहे. परदेशींच्या भरारी फाउंडेशनने जळगावात यूथ होस्टेल निर्मितीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनीच ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

यूथ होस्टेलसाठी अपेक्षा
>अनाथ तरुण-तरुणींसाठी उभारायच्या होस्टेलसाठी सागरला जिल्ह्याच्या ठिकाणी जागा हवी आहे. त्यासाठी त्याच्या अपेक्षा अशा आहेत.
> जागा शहरालगत असावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्याकरिता वेगळा प्रवासखर्च लागणार नाही.
> किमान 12 गुंठे जागा मिळाली तरी होस्टेल उभारले जाऊ शकते.
> प्रमुख दात्याचे नाव त्या होस्टेलला दिले जाऊ शकते.
> अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक सागर रेड्डी 9011241939; दीपक परदेशी (9970569942 )


कोण आहे सागर रेड्डी ?
> आई महाराष्ट्रीय आणि वडील कर्नाटकी. आंतरधर्मीय विवाहामुळे नातलगांकडूनच दोघांचा खून झाला.
> सागरही त्या संतापाचा बळी ठरू नये म्हणून आजोबांनी त्याला अनाथाश्रमात दाखल केले. काही वर्षांतच त्यांचे निधन झाले.
> वयाची 18 वर्षे पूर्ण होताच सागरला अनाथाश्रमाच्या बाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्याने 12 वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.
> सतत तीन वर्षे मजुरी करून आणि देवळात राहून त्याने पैसे जमविले आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.
> लार्सन अँण्ड टुबरे कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतो.
> अनाथाश्रमातून बाहेर काढल्या जाणार्‍या तरुण-तरुणींसाठी त्याने काम सुरू केले. त्यासाठी एकता निराधार संघ नावाची संस्था स्थापन केली.
> आतापर्यंत संस्थेमार्फत 236 तरुणांना आधार दिला. त्यात 108 विद्यार्थिनी आहेत.