आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगामध्ये भरधाव ट्रकने प्रौढास चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर इच्छादेवी चौफुलीजवळ बॉम्बे बेकरीशेजारी असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजता भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडले. त्यानंतर ट्रकचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहतूक पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून हॉटेल मानसजवळ खताने भरलेला तो ट्रक पकडला. एकाच आठवड्यात या भागात हा दुसरा अपघाती बळी आहे.

शनिवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास गवंडी काम करणारे अशोक काळे (वय ४२, रा. मच्छीबाजार, तांबापुरा) हे पायी घराकडे जात होते. त्या वेळी समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने (जीजे- ०५, बीटी- ८९८६) काळे यांना चिरडले. त्या वेळी इच्छादेवी चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस धनराज पाटील, अनिल पाटील आणि देवराज परदेशी यांनी त्याचा पाठलाग केला.

अजिंठा चौफुलीजवळ हॉटेल मानसनजिक चालकाने ट्रक सोडून पळ काढला. त्या वेळी क्लीनरला संतप्त जमावाने मारहाण करून ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिस धनराज पाटील यांनी ट्रक चालवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेल्याने अनर्थ टळला.

आठवड्यातील दुसरा बळी
इच्छादेवी चौकात आठवडाभरातील हा दुसरा अपघाती मृत्यू आहे. २८ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास योगिराज जाधव (वय ३२, रा. सिंधी कॉलनी) यालाही ट्रकने चिरडले होते.
अशी पटली ओळख
शनिवारी सायंकाळी अपघात झाल्यानंतर मृत काळे यांची सुरुवातीला ओळख पटली नव्हती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर पोलिसांना त्यांच्या खिशात एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्याच्यावर कॉल केल्यानंतर तो मोहीत गॅस एजन्सीच्या व्यवस्थापकाचा होता. त्यांना मृताची ओळख पटवण्यासाठी बोलावल्यानंतर त्यांनी मृत व्यक्ती त्यांचे ग्राहक अशोक काळे असल्याचे सांगितले.