आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Six Cattle Death Due To Thunder Showring In Jalgaon District

जळगाव जिल्ह्यात वीज पडून सहा गुरे ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पावसामुळे अनेक ठिकाणी पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाले असून पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात आली आहे. सलग दुसर्‍या दिवशीही ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

पारोळा शहर व परिसरात वरूणराजाची यंदाही चांगली कृपा दिसत आहे. तालुक्यात रविवारपासून सलग चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास छोटे नाले व नद्यांना पूर आला. त्यामुळे छोटी नदी, नाल्या काठावरील कूपनलिका, विहिरींच्या जलपातळीत वाढ होत आहे. पारोळा भागात 19 मिलीमीटर, चोरवड परिसरात नऊ मिलीमीटर, तामसवाडी भागात 19 तर बहादरपूर परिसरात 19.4 मिलीमीटर पाऊस झाला. सतत जोरदार पाऊस होत असल्याने शेतामध्ये वाफसा झाला नाही.

पशुपालकांचे झाले नुकसान
शेवगे प्र.भागात जोरदार पावसासह वादळ झाले. वीज कोसळल्यामुळे नारळाचे झाड जळाले. तसेच माजी कृषी सभापती डॉ.दिनकर पाटील यांच्या मालकीची जर्सी गाय व तीन वर्षांचा गोर्‍हा वीज कोसळल्याने ठार झाला आहे. सुभाष सुकदेव हटकर यांच्या मालकीची सुमारे 70 हजार रुपये किमतीची म्हैसही ठार झाली आहे. कोळपिंप्री येथील विजयकुमार भिवसन पाटील यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. राजीव गांधीनगर भागातील मातीची काही घरे पावसामुळे ढासळली आहेत. समाधानकारक पावसामुळे पाणीटंचाईपासून सुटका होण्यास मदत होईल. काही ठिकाणचे पाणीपुरवठय़ाचे टँकर बंद करण्याचे संकेत तहसीलदार डॉ.सुरेश कोळी यांनी दिले आहेत.

चोपड्यात पुन्हा मुसळधार पर्जन्यवृष्टी
चोपडा तालुक्यात बुधवारी पहाटे पुन्हा मुसळधार पाऊस झाला. पहाटे 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे बागायतदार शेतकर्‍यांना सर्वाधिक आनंद झाला आहे. या अगोदर पाणीटंचाईमुळे सुकत असलेल्या बागायतीला आता जीवदान मिळाले आहे. या पावसाचा कपाशी लागवडीसाठीसुद्धा अधिक मदत होईल. आडगाव, विरवाडे, चौगाव, लासूर, हातेड, घोडगाव, चहार्डी, निमगव्हाण, वर्डी, अडावद, धानोरा आदी परिसरात समाधानकारक पाऊस झाला आहे. मागील वर्षी रत्नावती नदीला एकही पूर आला नव्हता.

यावर्षी पावसाला मृग नक्षत्र लागण्यापूर्वीच राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून पाऊस समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.


पारोळा, धरणगाव, चोपडा तालुक्यात धुवाधार पाऊस
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात सलग चौथ्या दिवशी, चोपड्यात सतत तिसर्‍या दिवशी तर धरणगावातही बुधवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास धुवाधार पाऊस झाला. याप्रसंगी ढगांचा गडगडाट तर विजांचा कडकडाट झाला. धरणगाव तालुक्यात दोन तर पारोळा तालुक्यामधील एका ठिकाणी वीज कोसळून एकूण सहा गुरे ठार तर तीन झाडेही जळाली आहेत.