आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक जागी सिगारेट ओढताय, खिशात ठेवा 200 रुपये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पोलिस प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. अशा प्रकारच्या कारवाईत सातत्याची अपेक्षा असून यामुळे तरुण पिढीला व्यसनांपासून परावृत्त करण्यास मदतच होणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शहरातील बहुसंख्य भागात सर्रास गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. या कायद्यांतर्गत पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, औषध निरीक्षक, अन्न निरीक्षक, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयातील प्रमुख अथवा प्रभारी अधिकारी हे धूम्रपान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान न करण्यासंदर्भात नागरिकांसाठी सूचना फलक प्रवेशद्वाराजवळ लावणे बंधनकारक आहे. तसे फलक न लावणे हादेखील कायद्याचे उल्लंघन ठरतो.
तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावरही बंदी; 1800-110-456 या टोल फ्री क्रमांकावर करा तक्रार
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरात - निर्बंध आणि त्यांचा व्यापार, उत्पादन, पुरवठा व वितरण यावर नियंत्रण) अधिनियम 2003 च्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई आहे. या कायद्यांतर्गत कलम 4नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार्‍यास 200 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. या कायद्याची अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 2008 पासून म्हणजे गांधी जयंतीपासून करण्यात आली आहे.सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी आहे. रुग्णालयाच्या इमारतींसह आरोग्य संस्था, रेल्वेस्थानक, बस स्टॅण्ड, मनोरंजनाची केंद्रे, अल्पोपाहाराच्या ठिकाणी, शासकीय कार्यालय, न्यायालय, शैक्षणिक संस्था, सिनेमा थिएटर तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचे येणे जाणे असते अशा ठिकाणी सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे बंदी आहे.
कारवाईचे स्वागत
पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईचे स्वागतच आहे. धुम्रपानाचे सध्या अल्पवयीन मुलांमध्येही हे प्रमाण अधिक आहे. कारवाईत सातत्य गरजेचे आहे. - चंद्रकांत पाटील, फॉरेस्ट कॉलनी.
बंदी घालायला हवी गुटखा बंदी असताना विक्री होते, धूम्रपान करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पालकांनीही जागरूकपणे मुलांकडे लक्ष ठेवावे. - रार्जशी चौधरी, गृहिणी.
तक्रारींची दखल घेणे गरजेचे
धूम्रपानास विरोधाचे फलक लावण्याचीही तरतूद आहे. प्राधिकृत अधिकार्‍यांजवळ धूम्रपानासंदर्भात तक्रार केल्यास त्याची दखल घेणे बंधनकारक आहे. - अँड.जैनोद्दीन शेख, वकील.