आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसटी’तही चालणार एसएमएस तिकीट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - विमान, रेल्वेप्रमाणेच आता एसटी महामंडळानेही ऑनलाइन तिकीट काढणा-या प्रवाशांना केवळ मोबाइलवरील ‘एसएमएस तिकिटा’वर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने नियमांत हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे.


राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे महामंडळाच्या बसेसऐवजी प्रवाशी खासगी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत होते. याचा आर्थिक फटका परिवहन मंडळाला बसत होता. हा तोटा भरून काढण्यासाठी व प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रवाशांना अधिक सुविधा देण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी ऑनलाइन तिकिट बुकिंग करणा-या प्रवाशांना प्रवासा दरम्यान ई- तिकीट बाळगणे सक्तीचे होते. मात्र, बहुतेक वेळा ऑ नलाईन बुकिंग केल्यानंतरही प्रवाशांकडे त्याची प्रिंट उपलब्ध नसे. परिणामी आगाऊ बुकिंग करूनही अनेक प्रवाशांना केवळ तिकिटाची प्रिंट सोबत न ठेवल्याचे दंडाचा बडगा उगारला जात होता. विमान व रेल्वे प्रवासात केवळ ‘एसएमएस’वर प्रवासाची मुभा दिली जात असताना एसटी महामंडळ मात्र अन्याय करत असल्याची भावना प्रवाशांत होती. हे प्रकार टाळण्यासाठी महामंडळाने नियमात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तिकीट रद्द, रक्कम परत
नवीन नियमानुसार प्रवाशांनी ई- नोंदणी केल्याची पुष्टी मिळाल्यास त्यांना तिकिटातही सवलत दिली जाणार आहे. प्रवासाचा बेत ऐनवेळी रद्द झाल्यानंतर तिकिटाची रक्कम यापूर्वी परत दिली जात नव्हती. मात्र, आता बस सुटण्याच्या चार तासांपूर्वी आरक्षण रद्द करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तिकीट रद्द केल्यास एकूण रकमेतील आरक्षण व सुविधा शुल्काची कपात करून उर्वरित रक्कम प्रवाशांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

चांगली सेवा देण्याचा प्रयत्न
राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दक्षता घेण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे.
ताराचंद पाटील, आगारप्रमुख, भुसावळ