आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Road Blocked For Marriage, Divya Marathi

लग्नासाठी अडवला रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या मार्गावर लग्नसमारंभासाठी मध्यभागी मंडप टाकून आठ गावांना जाणारा मार्ग अडविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा मंडप टाकण्यास परवानगी दिल्यानंतर किती लोक प्रभावित होतील, त्यांना काय त्रास होईल,वाहतूक कशी वळवावी लागेल, याचा कोणताही विचार न करता चौदाशे रुपयांची पावती फाडून दोन दिवस रस्त्यावर मंडप टाकण्यास परवानगी देऊन टाकली. महापालिकेच्या या आडमुठे धोरणामुळे आठ गावांच्या बसेस दुसर्‍या मार्गाने वळवाव्या लागल्या. यामुळे अंतर वाढून एसटी.महामंडळाला तब्बल एका दिवसासाठी 20 हजार रुपयांचा अतिरिक्त डिझेल खर्चाचा भुर्दंड बसणार आहे. महापालिकेला 1400 रुपयांचा फायदा करून देणारे हे लग्न एसटी महामंडळाला मात्र 40 हजार रुपयांचा फटका देणारे ठरले आहे.
शहरातील वाल्मीकनगरमार्गे असोदा, भादली, शेळगाव, सुजदे, भोलाणे, कानसवाडा, देऊळवाडा, तरसोद या गावांसह मोहन टॉकीज, बहिणाबाई कॉलनी या भागात जाणारा मार्ग दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरातील रहिवासी अशोक बाविस्कर यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी हा रस्ता अडविला आहे. बाविस्कर यांनी महापालिकेकडे रीतसर परवानगी अर्ज दिला आहे. परवानगीपोटी 1400 रुपयांचे शुल्कही त्यांनी महापालिकेत भरले आहे. महापालिकेने त्यांना परवानगी देताना अतिक्रमण विभागाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. पण अतिक्रमण विभागाच्या कोणत्या अटी व शर्ती आहेत, याची कोणतीही नोंद केली नाही. त्यामुळे लग्न आयोजकाची यात किती चूक आहे, हे सांगणे अवघड आहे. परवानगी देणार्‍या महापालिकेच्या अधिकार्‍यानेच ‘शासकीय’ काम केले आहे. शनिवारी सकाळी 8.00 वाजेपासून छोटी चारचाकी वाहने तर सोडाच दुचाकीसाठीही रस्ता न सोडता अडविला आहे. या अंधाधुंद प्रकारामुळे शनिवारच्या बाजारासाठी येणार्‍या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. परिणामी दिवसभरातील या मार्गावरील 136 बसेसच्या परतीसह अजिंठा चौफुली, कालिकामाता मंदिर, जुने जळगाव असा पाच किलोमीटरने अतिरिक्त फेरा वाढला.
महापालिकेची अजब परवानगी
महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागांतर्गत भररस्त्यावर मंडप टाकण्याची परवानगी कशाच्या आधारावर दिली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.