आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : साडेसात हजार कृषिपंप बसवल्यास वर्षाला २१.६० कोटींची वीज बचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यात विजेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे पर्यायी विजेचा वापर सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौरऊर्जेवर चालणारे ७ हजार ५०० कृषिपंप राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने प्रायोगिक तत्त्वावर घेतला आहे. दिवसाला एक पंप ६ तास चालला, तर २४ युनिट विजेची बचत होईल. ५ रुपये प्रतियुनिटप्रमाणे आज शेतकऱ्यांना वीज घ्यावी लागत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वर्षाला २१ कोटी ६० लाख रुपयांची वीज वाचविणे शक्य आहे. खर्च मात्र एकदाच मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे.
देशात राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये सौरऊर्जेवर चालणाऱ्या कृषिपंपांचा वापर अधिक सुरू झाला आहे. महाराष्ट्रात जळगावातील जैन इरिगेशन कंपनीचे जैन जीवन सोलर पंप जळगाव, नाशिक आणि विदर्भात ७ ते ८ ठिकाणी सुरू आहे. देशात सध्या सुरू असलेल्या सोलर कृषिपंप पुरवठ्यात जैन इरिगेशनचा ५२ टक्के वाटा आहे. जैन ग्रुपशिवाय किर्लोस्कर, शक्ती, टाटा पॉवर, सनएडिशन कंपन्या पॅनल आणि सोलर कृषिपंप तयार करतात. बीएलडीसी प्रकारातील सिस्टिम सूर्योदयानंतर लगेच सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत सुरू ठेवता येतात, तर एसी प्रकारातील सिस्टिम सूर्योदयानंतर साधारण दोन तासांनी सुरू होतात.
एक लाख शेतकरी कृषिपंपाच्या प्रतीक्षेत
राज्यात विजेचा तुटवडा असल्यामुळे १ लाख शेतकऱ्यांना कृषिपंप हवे आहेत. त्यापैकी साधारण ५३ हजार शेतकऱ्यांनी डिमांडनोट भरल्यानंतरही वीज उपलब्ध होत नाही. सोलर कृषिपंप त्यावर एक चांगला पर्याय होऊ शकतो.
सोलर पंपासाठी २ लाख गुंतवणूक
सोलर कृषिपंपसाठी लागणारे पॅनल, पाइप आणि सिस्टिम भारतातच तयार होत असल्यामुळे दीड ते दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र हा खर्च एकाच वेळेस करावा लागणार आहे. यापूर्वी हा ३ हॉर्सपॉवरचा सोलर कृषिपंप तयार करण्यासाठी ३ ते साडेतीन लाख रुपये खर्च येत असे. सर्वच साहित्य आयात करावे लागत होते, आता हा खर्च कमी करण्याचे स्थानिक कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
फायदे : सोलर कृषिपंपावर एकदा खर्च केल्यानंतर वीज बिल आणि वीजपुरवठा यावर अवलंबून राहावे लागणार नाही. २५ वर्षे एक कृषिपंप चालू राहू शकतो. राज्यशासनाचीही मोठी बचत या माध्यमातून होणार आहे.