आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या नव्या इमारतीवर सौर पॅनल बसवून वीजबिलात बचत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर सौर पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला प्रारंभ होईल. हे काम झाल्यावर वीजबिलावर खर्च होणारे सुमारे अडीच लाख रुपये वर्षाकाठी वाचणार आहेत.
महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पन्नाची बाजू वाढवण्यासाठी महापालिकेने उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासह खर्च कमी करण्यावर भर दिला आहे. महापालिकेला दरमहा कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल इतर महत्त्वाच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. केवळ वीजबिलापोटी एक कोटी रुपये द्यावे लागतात. वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी मध्यंतरी साक्री तालुक्यात टिटाणे शिवारात पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी वर्षापासून प्रयत्न सुरू अाहे. त्यानंतर आता शाळा क्रमांक एकच्या आवारात निर्माणाधीन असलेल्या महापालिकेच्या नवीन इमारतीच्या छतावर सौर पॅनल लावण्यात येणार आहे. या पॅनलची वीजनिर्मिती क्षमता पन्नास किलो वॅट असेल. हे सौर पॅनल लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे महापालिका प्रशासनातर्फे प्रस्ताव देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या नवीन इमारतीवर बसवण्यात येणाऱ्या सौर पॅनलमुळे महापालिकेचे वर्षाला अडीच लाख रुपये वीजबिल वाचणार आहे. दरम्यान, महाालिकेच्या आवारात असलेल्या प्रसूती केंद्राच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणीही काही प्रमाणात विजेच्या खर्चात बचत होत असल्याची स्थिती आहे.

वीज कंपनीला देणार वीज
महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या छतावर असलेल्या सौर पॅनलमध्ये निर्माण होणाऱ्या विजेचा सुटीच्या दिवशी वापर होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी वीज कंपनीला वीज दिली जाणार आहे. नेट मीटरिंगद्वारे याचे रीडिंग घेण्यात येऊन वीजबिलात रकमेची कपात केली जाणार आहे.

महापौर महालेेंचे पत्र
सौरपॅनल बसवण्यासाठी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सन २०१७-१८ या अार्थिक वर्षाच्या आराखड्यात या कामाचा समावेश करावा निधी उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव महापौर कल्पना महाले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...