आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेचा वापर करून रोज दोनशे वॅट विजेची निर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - केवळ वन पर्यटन, जंगल सफारी पुरते लळिंग कुरणाचे महत्व मर्यादित राहिलेले नाही. आता या कुरणात सौर पवन ऊर्जेचा वापर करून पहिल्या टप्प्यात सरासरी १८० ते २०० वॅट वीजनिर्मिती होत आहे. भविष्यात ही क्षमता वाढवण्यात येणार आहे. कुरणात वन पर्यटकांचा रात्रीचा मुक्काम सुरू झाल्यावर त्यासाठीही जास्त ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. हे सर्व करताना अर्थातच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
वन पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर लळिंग कुरणाच्या विकासाला गती देण्यात आली आहे. लवकरच जंगल सफारी आणि रात्री वन पर्यटनाचा आनंदही पर्यटकांना घेता येणार आहे. सध्या त्याचे काम सुरू आहे. लळिंग कुरणाला वन पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. शिवाय शासनही या भागात अधिक पर्यटक कसे येतील या हेतूने विकास कामाला लागले आहेत. कुरणात लांडोर बंगला असून, या ठिकाणी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे. त्यामुळे लांडोर बंगल्याला एेतिहासिक वारसा लाभला आहे. लांडोर बंगला परिसरात नुकतेच सौरऊर्जेवर चालणारे दिवे लावण्यात आले आहेत. सौरऊर्जेसोबत पवन ऊर्जेवर चालणारे दिवे काही ठिकाणी लावण्यात आले आहेत. सौरऊर्जा निर्मितीचे पॅनल उंच ठिकाणी लावण्यात आले आहेत. याशिवाय बंगल्यापासून काही अंतरावर; परंतु उंच जागी पवन ऊर्जेचा टॉवरही उभारण्यात आला आहे. सुमारे १८ वॅटचे दहा दिवे रात्रभर कुरणातील काळोख भेदू शकतील एवढी वीज निर्मिती सौर पॅनल पवन ऊर्जेद्वारे होत आहे. हे सर्व करताना वनातील शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. लळिंग कुरण किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेले राहुट्या उभारणीचे कामही अंतिम टप्प्यात आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ काढल्यामुळे तलावात चांगला जलसाठा झाला आहे.
या तलावातील पाणी जवळच असलेल्या विहिरीपर्यंत गुरुत्वाकर्षण नियमाचा वापर करून नेले जाणार आहे. त्यानंतर पुढे असलेल्या पर्यटकांच्या राहुट्यांपर्यंत पाणी नेण्याचे काम केले जाणार आहे. विहिरीत पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतर पाणी बाहेर ओढण्यासासाठी इंधन अथवा विजेएेवजी सौरऊर्जेचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. शिवाय निर्माणाधीन पर्यटकांच्या राहुट्यांजवळ पथदिवे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थातच सौरऊर्जा पवन ऊर्जेची मदत घेतली जाणार आहे. सध्या याचे काम सुरू आहे. काही दिवसातच लळिंगचा संपूर्ण परिसर या ऊर्जेमुळे प्रकाशमान होऊ शकणार आहे; परंतु सध्या तरी सुमारे १८० ते २०० वॅटपर्यंत ऊर्जा निर्मिती लळिंगमधील सौर पवनचक्कीच्या माध्यमातून होऊ लागली आहे.

ठिकठिकाणी बसवले पॅनल
^कुरणातील आवश्यक ठिकाणी सौर तसेच पवन ऊर्जेचे पॅनल बसविले आहे. त्याचा उपयोग होत आहे. वनातील शांतता भंग होणार नाही. याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. वन पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या राहुट्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पर्यटकांना पुढील वर्षापर्यंत जंगल सफारीचा आनंद उपभोगता येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त निधीची शासनाकडून मागणीही करण्यात आली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. -एस.आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी

प्रस्तािवत पुलावरही पथदिवे...
गेल्याबुधवारी पर्यटनमंत्री अामदार जयकुमार रावल यांनी लळिंगला भेट दिली होती. लळिंग किल्ला ते कुरण या दरम्यान असलेल्या ओढ्यावर सुमारे ४० फूट उंच पूल साकारला जाणार आहे. या पुलावरही भविष्यात सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.

सुरक्षेला देण्यात आले प्राधान्य
लळिंग कुरणाजवळ विजेवर चालणारे दिवेही लावता येऊ शकले असते. त्यासाठी उच्च दाबाची वाहिनी थेट कुरणापर्यंत आणावी लागली असती. यदा कदाचित उच्च दाबाची तार निखळून पडल्यामुळे यातून वन्यजीवांना धोका उद्भवू शकला असता. भविष्यातील या साऱ्या गोष्टींचा विचार करून सौरऊर्जा पवन ऊर्जेच्या नैसर्गिक स्रोताला प्राधान्य देण्यात आले अाहे. तसेच विजेवरील दिव्यांची संपूर्ण यंत्रणा खर्चीक ठरू शकली असती, अशी माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...