आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयद्रावक: मुलांविरुद्ध आई लोकअदालतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पतीच्या निधनानंतर मुलांना शिकवले. एकाला डॉक्टर तर दुस-याला इंजिनिअर केले. दोघेही मुले मोठ्या शहरांमध्ये उद्योग, व्यवसायाला लागले. मात्र, वृद्ध आईला स्वत:चे पालनपोषण करण्यासाठी मोठ्या मुलाकडे न्यायालयातून खावटी मागण्याची वेळ आली आहे. हा खटला न्यायालयात 22 वर्षांपासून सुरू आहे.
चाळीसगाव येथे एका दर्ग्यात या आजीबाई वास्तव्याला आहेत. प्रमीलाबाई लक्ष्मण गोंधळी असे त्यांचे नाव आहे. शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीत त्यांचा खटला नव्हता; मात्र तरीही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत त्यांनी न्यायालय गाठले होते. पतीच्या निधनानंतर त्यांना हजार रुपयांची पेन्शन मिळते. पण पोटच्या मुलांचे प्रेम मिळत नसल्याची खंत त्यांना वाटते. चाळीसगावच्या ज्या दर्ग्यात त्या राहतात तेथूनही त्यांना बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. लहान मुलगा नाशिकला डॉक्टर आहे. तो वर्षातून एकदा भेटायला येतो. मात्र, सोलापूरचा इंजिनिअर मुलगा कधीच भेटायला आला नाही. उलट त्या मुलाने वडिलांच्या नावावर असलेले काही पैसे जामनेर येथील जमीनही स्वत:च्या नावावर करून घेतली असल्याचा आरोप आजीबाईंनी केला असून ती परत मिळवण्यासाठी त्यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे.
खावटी न्यायालयात धाव
दोन्हीमुलांचे लग्न झाले आहे. मोठा मुलगा सोलापूरमध्ये इंजिनिअर आहे. त्याने खावटी द्यावी यासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. तर लहान मुलगा वर्षातून एक वेळा भेटायला घेऊन जातो, मदत करतो. माझ्या पतीच्या निधनानंतर मिळालेली आर्थिक मदतही मोठ्या मुलाने मला मिळू दिली नाही. प्रमिलाबाई गोंधळी

आजीबाईंचे पती दोन मुले एका मुलीसह शिवाजीनगर येथे राहत होत्या. त्यांचे पती महापालिकेच्या शाळेत शिक्षक होते. सन १९८६ला पतीचे निधन झाले. त्यानंतर दोन भावांच्या मदतीने आजींनी मुलांचे शिक्षण केले. मुलीचे लग्न केले. सन १९८९मध्ये आजी चाळीसगावला निघून गेल्या. सन १९९२पर्यंत मुलांनी त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर मुलेही नाशिक सोलापूर येथे निघून गेले. उदरनिर्वाहासाठी आजींकडे पेन्शन होती; मात्र हक्काचे घर नव्हते. म्हण्ून त्या दर्ग्यांत राहू लागल्या. मोठ्या मुलाकडून खावटी मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने ३०० रुपये महिन्याची खावटी मंजूर केली. पाच-सहा महिने खावटी दिल्यानंतर मुलाने ती परत दिलीच नाही. त्यासाठी पुन्हा आजींनी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयात खटला सुरूच राहील, पण तत्पूर्वी या आजींना आता जळगावच्या रेल्वेस्थानकावर राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, त्यात आजींच्या पेन्शनवरही संकट आले आहे. उपासमारीची वेळ येण्याचे संकट आजींच्या डोक्यावर घोंगावत आहे.