आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपात केंद्रांची पुन्हा तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गर्भपाताच्या घटनांमध्ये परळीनंतर राज्यात गाजलेल्या जळगाव शहरातील गर्भपात केंद्रांची पुन्हा तपासणी सुरू होणार आहे. 21 नोव्हेंबरपासून तब्बल 60 केंद्गांची तपासणी केली जाईल. प्रत्येक केंद्रांची नोंदणी झाली आहे की नाही याची माहिती घेतली जाणार आहे. तसेच बेकायदेशीरपणे केंद्र चालवणार्‍या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रत्येक डॉक्टरवर ‘वॉच’ ठेवणार आहे.

मुलगाच हवा या हव्यासापोटी पैसा मोजणार्‍या पालकांच्या हट्टाला डॉक्टरांनीसुद्धा साद देत गर्भपाताचा धंदाच सुरू केला. या प्रकाराला आळा बसण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम 2003 अंतर्गत स्थापन केलेल्या राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला झाली. यात वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय गर्भपात केंद्रांची संख्या आणि महाराष्ट्रातील एकूण स्त्री रोगतज्ज्ञांची संख्या विचारात घेता सर्वच केंद्रांची नोंदणी झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार महाराष्ट्रात गर्भपात करणार्‍या सर्व केंद्रांची कायद्यान्वये नोंद करणे आवश्यक झाले आहे. जिल्हय़ात प्रत्येक डॉक्टर जो गर्भपात करतो, त्या प्रत्येक डॉक्टरला समुचित प्राधिकार्‍यांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.

गर्भपात करत असलेले जे डॉक्टर वैद्यकीय व्यावसायिक नोंदणी करणार नाहीत अशा केंद्रधारकांवर वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 व सुधारित कायदा 2003 नुसार कारवाई होणार आहे. दरम्यान, या मोहिमेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे.

60 दिवसांची मोहीम
राज्यातील प्रत्येक दवाखान्याची तपासणी करून एमटीपी कायद्यानुसार पात्रता पाहून नोंदणी प्रमाणपत्र देण्याच्या सूचना समुचित प्राधिकार्‍यांना दिल्या आहेत. ग्रामीण भागातील गर्भपात केंद्राच्या नोंदणीकरिता जिल्हा शल्यचिकित्सक तर नागरी भागातील गर्भपात केंद्रांच्या नोंदणीकरिता महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांकडे अर्ज करावे लागणार आहेत.

अशी असेल महापालिकेची संनियंत्रण समिती
वैद्यकीय गर्भावस्था समाप्ती अधिनियम 1971नुसार राज्यातील प्रत्येक महापालिकेच्या कार्यक्षेत्राकरिता ही संनियंत्रण समिती गठित केली आहे.

यात अध्यक्ष : वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका, सदस्य : विभागप्रमुख स्त्रीरोग विभाग किंवा चिकित्सक किंवा भूलतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, आरोग्य समितीचे सभापती आदींचा समावेश आहे.

नोंदणीपेक्षा विक्री जास्त
जळगाव शहरातील सोनोग्राफी सेंटरच्या नोंदणीच्या तुलनेत जळगावसाठी खरेदी करण्यात आलेल्या सोनोग्राफी मशीनचे प्रमाण अधिक असल्याचे काही कंपन्यांकडील आकडेवारीवरून लक्षात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे गर्भपात केंद्रांची तपासणी करताना बेकायदेशीररीत्या सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.