आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षणगृहाचे ‘ते’ पत्र्यांचे शेड अखेर काढले, एसपींची पाहणी; मुलांसाठी स्वतंत्र केअर टेकर नेमण्याची सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - निरिक्षण गृहातील पत्र्यांच्या शेडमुळेच तिन्ही अल्पवयीन संशयित मुलांनी पळ काढल्याचे निदर्शनास आल्याने ते शेड रविवारी काढून टाकण्यात आले. तर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी सोमवारी बालनिरीक्षणगृहाची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला.   
 
भुसावळ येथील रेल्वेच्या उड्डाण पुलाखाली २१ जानेवारी राेजी अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केला हाेता. या चारही  संशयितांची  बालन्यायालयाने  २२ जानेवारीला जळगाव येथील बालसुधारगृह आणि निरीक्षणगृहात   रवानगी केली. मात्र, १७ फेब्रुवारी राेजी दुपारी ३.३० वाजता त्यापैकी तीन संशयितांनी पत्र्यांच्या शेडवरून संरक्षण भिंतीबाहेर उड्या मारून पलायन केले हाेते. पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन निरीक्षणगृहाच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे निरीक्षणगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न एेरणीवर अाला आहे. तसेच एसपींनी साेमवारी सकाळी १०.३० वाजता पहाणी करून आढावा घेतला. महिला-बालविकास अधिकारी रमेश काटकर, उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे, अधीक्षक सारिका नेतकर उपस्थित हाेते.

निरीक्षणगृहात पोलिस कर्मचाऱ्यांची मागणी  
जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर यांनी निरीक्षणगृहाचा आढावा घेताना सुरक्षारक्षकांविषयी विचारणा केली. मात्र, निरीक्षणगृहात सुरक्षारक्षक नसून, काळजीवाहक (केअरटेकर) असल्याचे सांगितले. महिला-बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी सुरक्षारक्षक म्हणून पाेलिस कर्मचाऱ्यांची मागणी केली. कारण निरीक्षणगृहात येणारे अनेक संशयित गंभीर गुन्ह्यातील असतात. त्यांना हाताळण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात अाले.  

एसपींनी केल्या सूचना  
निरीक्षणगृहाची पाहणी केल्यानंतर डाॅ. सुपेकर यांनी निरीक्षणगृहाच्या अधीक्षकांना सूचना केल्या. त्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, निरीक्षणगृहातील मुलांसाठी ज्या ठिकाणी त्यांना ठेवले अाहे, त्या ठिकाणीच शौचालय, बाथरूम बांधण्याच्या सूचना दिल्या. विधी संघर्ष बालकांसाठी स्वतंत्र्य केअर टेकर नेमावे, जिन्यावर संरक्षण जाळी लावावी, दक्षिणेकडील भिंतीवर तारेचे कुंपण घालावे, जिन्याचे गेट कायम बंद ठेवावे अशा सूचना दिल्या.   

रविवारी मुलांमध्ये हाणामारी
रविवारी रात्री निरीक्षणगृहातील दाेन संशयितांमध्ये हाणामारी झाली. यासंदर्भात निरीक्षणगृह अधीक्षकांनी डाॅ. सुपेकर यांना माहिती दिली. जे गंभीर गुन्हेगार असतील अशांची नाशिक येथे रवानगी करण्यासंदर्भात काही करता येईल काय? यासंदर्भात माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  न्यायालयाची परवानगी घेऊन अशा विधी संघर्ष बालकांना दुसरीकडे हलविणे शक्य अाहे काय? त्याबाबत चाैकशी करण्याची सूचना डाॅ. सुपेकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...