आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना आव्हान : एसपी कार्यालयात बसेस लावू! ट्रॅव्हल्समालकांचा पोलिसांना दम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नेरीनाक्यावरील विठ्ठल मंदिराच्या जागेवरील थांब्याला विरोध करीत ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी शनिवारी थेट पोलिसांनाच आव्हान दिले.
पोलिस अधीक्षकांनी थांब्याबाबत लेखी आदेश दिलेले नसल्यामुळे ट्रॅव्हल बसेस शहरात लावू द्याव्यात; अन्यथा बसेस थेट पोलिस अधीक्षक कार्यालयातच आणून उभ्या करू, असा सज्जड दम ट्रॅव्हल्सच्या मालकांनी दिला आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि काही ट्रॅव्हल मालकांचे लागेबांधे असल्याचा आरोपही या मालकांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे नेरी नाक्याजवळील थांब्याच्या प्रश्नावरून ट्रॅव्हल्समालकांमध्येच फूट पडली असल्याचेही दिसून आले. शनिवारी काही ट्रॅव्हल मालकांनी संगीतम ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत थेट पोलिसांनाच आव्हान दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाजवळ तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी बेशिस्त पार्किंग करणाऱ्या खासगी बसेसमुळे दररोज सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती त्यामुळे पोलिस प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमीनजीक असलेल्या विठ्ठल मंदिर संस्थानच्या मैदानावर थांबा करण्याचा तोडगा काढला. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी अधिसूचनाही काढली होती. विठ्ठल मंदिर संस्थानाची जागा त्यासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात अाली. मात्र, १३ ट्रॅव्हल्सचालकांनी याविराेधात आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अार.एम.बाेर्डे, न्यायमूर्ती ए.अाय.एस. चिमा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी शासनाचा खुलासा मागवला अाहे. २१ डिसेंबरला पुढील सुनावणी हाेणार अाहे. या प्रकरणी शनिवारी जिल्हा पाेलिस अधीक्षकांसोबत ट्रव्हल मालकांची बैठक झाली.यावेळी २१ तारखेपर्यंत शहरात ट्रॅव्हल्स अाणू द्याव्यात, अशी मागणी मालकांनी केली. मात्र, ती मागणी पोलिसांनी नाकारल्याने ट्रॅव्हल्सचालकांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी सतीश संघवी, सतीश देशमुख, अनुप लाठी, साैरभ पाटील, श्यामकांत पाटील, प्रकाश साहित्या, राजू साेमाणी, श्याम पाटील, जितेंद्र शर्मा, जितेंद्र चाैधरी अादी उपस्थित हाेते.

पाेलिस प्रशासनाचा नेरीनाक्याच्या जागेवर बस पार्किंग करण्यासाठी दबाव येत अाहे. तसेच त्यासंदर्भात अाम्हाला काेणताही लेखी अादेश दिला नसल्याचा अाराेप संघवी यांनी केला. त्या जागेला काेणाचीच परवानगी नाही. शेतीसाठी जागा संस्थानाला देण्यात अाली अाहे. शासनाने स्वत:च्या मालकीची जागा द्यावी. शासनाने ठरवून दिलेल्या जागेवर ७५ बस लागू शकत नाहीत. तसेच शहरात फक्त प्रवासी घेण्यासाठी अाणि साेडण्यासाठी बस अाणतात. काेणीही बस पार्किंग करीत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

अधिसूचनेला हरकत नाेंदवता येते
पाेलिस अधीक्षकांनी काढलेल्या अधिसूचनेला हरकत नाेंदवता येते. त्यामुळे शहरातील नागरिकांनी जिल्हा पाेलिस अधीक्षकांकडे हरकत नाेंदवण्याचे आवाहन संघवी यांनी पत्रकार परिषदेत केले.

शहरात ट्रॅव्हल्स अाल्यास कारवाई
ट्रॅव्हल्सचालकांनाशहरातबस अाणू नये, यासाठी कळवण्यात अाले अाहे. शहरात बस अाणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच महामार्गाच्या बाजूलाही बस लावू नये. ठरवून दिलेल्या ठिकाणीच बस पार्किंग कराव्यात. चंद्रकांत सराेदे, पाेलिसनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा

अटी पूर्ण केल्या तर बसेस लावणार
संस्थानाचे विश्वस्त अाणि काही ट्रॅव्हल्सचे मालक यांचे लागेबांधे अाहेत. त्यामुळे नेरी नाक्याच्या जागेसाठी हेका धरत अाहेत. त्या ठिकाणी एक पावती देण्यात येत अाहे. त्यावर काेणत्याही संस्थानाचा उल्लेख नाही. संस्थानाने सर्व ट्रॅव्हल्सचालकांच्या नावावर पाच वर्षांचा करार, संरक्षण भिंत, प्रसाधनगृह, पाण्याची सुविधा, प्रवाशांना बसण्यासाठी जागा, अशा सुविधा दिल्या तर ट्रॅव्हल्स त्या ठिकाणी लावू, असे संघवी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...