आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पा’ उद्योग आंतरराष्ट्रीय स्तरावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- चिकाटी, सर्मपण आणि ध्येय या त्रिसूत्रीमुळे नंदुरबारच्या रेखा चौधरी या महिलेने मसाज पार्लर सेंटर अर्थात ‘स्पा’ उद्योग जगतात आपले नाव जागतिक पातळीवर पोहोचवले आहे. त्यांनी संशोधित केलेल्या उपचार पद्धतींना वेगवेगळी तीन पेटंट मिळाली आहेत. उच्चभ्रू समाजात लोकप्रिय असलेला ‘स्पा’ सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. रशियातील मास्को येथे जगातील सर्वात मोठे स्पा डेस्टिनेशन साकारले जात आहे. त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच सोपवली आहे.
ग्रामीण भागात झालेले शिक्षण, त्यात इंग्रजी भाषेचा गंध नाही. परंतु इच्छा शक्ती दांडगी असेल तर कुठल्याही क्षेत्रात मात करता येते, हे नंदुरबारच्या रेखा अरुण चौधरी यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करून दाखवले आहे. मुंबईत रेमिल्युअर कंपनीच्या सेमिनारमध्ये तोडक्या मोडक्या इंग्रजी भाषेत स्वत:ची ओळख करून देणार्‍या रेखा चौधरींना या कंपनीने चक्क भारताच्या प्रमुख वितरकपदासाठी निवड केली. हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या उत्पादनाचे वितरण करण्यासाठी त्यांना सन 2004मध्ये प्रशिक्षणासाठी फ्रान्स येथे जावे लागले. इथे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी वेगवेगळे क्लास लावले. त्यानंतर त्या अस्खलित इंग्रजी बोलू लागल्या. सौंदर्य विषयक उत्पादने विक्री करण्यासाठी त्यांनी देशभरातील बड्या हॉटेल्स, मसाज सेंटर, स्पा केंद्रे पालथी घातली. या काळात त्यांना बर्‍या-वाईट अनुभवांना तोंड द्यावे लागले. देशभरात मार्केटिंगचा अनुभव पाठीशी आल्यानंतर त्यांना मार्ग सापडत गेला. त्यांनी सौंदर्यविषयक उत्पादने विक्री करताना ती कशी वापरायची, हे प्रशिक्षण देणे सुरू केले. म्हणजे उत्पादनासोबतच एक थीम, संकल्पना ते विकू लागले. यातून रेखा चौधरी यांच्या विषयी देश-विदेशातील कंपन्यांना खात्री वाटू लागली. त्यामुळे झोया, लावा, सोतेज, रसूल हमाम, बाबर, रेमिलोअर अशा विविध 25 विदेशी कंपन्यांचे ब्रँड चौधरींकडे चालून आले. त्या सौंदर्य उत्पादनाच्या जागतिक विक्रेत्या आहेत.