आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिय जळगावकर, सप्रेम नमस्कार,
आपल्याला माहितच आहे, तरीही सांगण्याचा मोह आवरला जात नाही म्हणून सांगतो. ‘दिव्य मराठी’ला जळगावात पाऊल ठेऊन आज बरोबर पाच वर्षे पूर्ण झाली. या पाच वर्षांत आपलं आणि ‘दिव्य मराठी’चं नातं अतूट बनल्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्याशी शेअर केल्याशिवाय राहवत नाही. पाच वर्षांचा काळ म्हणजे कोणत्याही वृत्तपत्रासाठी फार मोठा कालावधी नाही, पण ‘दिव्य मराठी’ने पहिल्या दिवसापासून वाचकांना केंद्रस्थानी मानल्यामुळे आपलं आणि ‘दिव्य मराठी’चं नातं घट्ट बनलं आहे. वृत्तपत्रं काढायचं तर ते फक्त वाचकांसाठी, वाचकांचं प्रमाणपत्रं हे कोणत्याही संस्थेच्या प्रमाणपत्रापेक्षा मोठं आहे, हे ‘दिव्य मराठी’ला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळेच यशपूर्तीचा पाचवा वर्धापन दिन साजरा करत असताना जळगाव शहरवासीयांना दिव्य मराठी पाच वर्षांत कसा वाटला, पुढील काळात दिव्य मराठीकडून काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्याचा आवश्य प्रयत्न केला. शालेय विद्यार्थी, युवक- युवती, महिला, शासन, प्रशासन, राजकारण, व्यापार, उद्योग, शिक्षण या साऱ्याच क्षेत्रातील प्रातिनिधिक स्वरुपात पाच वाचकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जशाच्या- तशा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला. विविध स्तरातील या वाचकांना दिव्य मराठीतील ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या, त्यासोबत त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्याही स्पष्टपणे मांडल्या आहेत. दिव्य मराठी हे भास्कर समूहाचे वृत्तपत्रं आहे. भास्कर समूह म्हणजे जगातील चौथ्या क्रमांकाचं दैनिक, अशी त्याची ओळख बनली आहे. देशातील १४ राज्यांमध्ये ६२ आवृत्या प्रसिद्ध करणारं हे एकमेव वृत्तपत्रं समूह आहे. वृत्तपत्रं हे केवळ बातमी देणारं माध्यम नाही तर सामाजिक, सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारीही या माध्यमाची आहे, याचे भानही या समूहाला आहे. त्यामुळेच देशभरात आपल्या सहकाऱ्याने अनेक अभियान आम्ही यशस्वी करू शकलो. ताजेच उदाहरण द्यायचे झाले तर, ‘एक वृक्ष एक जीवन’ हे अभियान देशभरात राबवले. महाराष्ट्रात जेथे, जेथे म्हणून दिव्य मराठी आहे, तेथे हे अभियान यशस्वी झाले. विविध व्यक्ती आणि संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हजारो वृक्ष लागवड केली आणि हे वृक्ष जगवण्याचे नियोजनही केले. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आणि घराघरात साजरा होणाऱ्या या उत्सवाआधीच दिव्य मराठीने पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि प्रदूषण टाळावे म्हणून वाचकांना आवाहन केले होते की, आपल्या घरात मातीची गणेशमूर्ती बसवा आणि तिचे घरातच विसर्जन करा, दिव्य मराठीच्या या आवाहनाला प्रतिसादही तेवढाच जोरदार मिळाला. शाडूमातीची गणेशमूर्ती कुठे मिळते आणि कोण बनवते हेही दिव्य मराठीने जाहीर केले. त्यामुळेच आज हजारो घरांत मातीची गणेशमूर्ती विराजमान झाली आहे. या मूर्तींचे कुंडीत विसर्जन करण्यासाठी दिव्य मराठीने महापालिकेसह अनेक सामाजिक संस्थांना आवाहन केले होते. मूर्ती विसर्जनाचे कुंडे तयार करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. आम्हाला खात्री आहे, येणाऱ्या काही वर्षांत मातीचा गणेश आणि या पाहुण्याचे घरातच विसर्जन ही परंपरा सुरू होईल. सामाजिक बदलाचा हेतू असो की, बातम्या देताना दिव्य मराठी नेहमीच आपल्या विश्वासाला पात्रं ठरलं आहे. अर्थात, आपल्या घरात भल्या पहाटे दिव्य मराठी पोहचविण्याचं काम जे करतात त्या विक्रेत्यांचाही यात मोठा वाटा आहे. म्हणूनच दिव्य मराठीला आपला सार्थ अभिमान वाटतो. पाचव्या वर्धापन दिनाच्या आपल्यालाही मन:पूर्वक शुभेच्छा..!
बातम्या आणखी आहेत...