आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष निधी वळवला सत्ताधा-यांच्या वॉर्डात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेस राज्य शासनाकडून प्राप्त झालेला विशेष निधी सत्ताधारी गटातील नगरसेवकांच्या वॉर्डात कामे करण्यासाठी वापरण्यात आला आहे. दरम्यान, या निधीतून विशिष्ट भागातच कामे होत असून सर्व वॉर्डांमध्ये समप्रमाणात निधीचे वाटप करून कामे व्हायला हवी, अशी मागणी भाजप नगरसेवक रवींद्र पाटील यांनी केली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नितीन लढ्ढा यांनी काम पाहिले. व्यासपीठावर आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव गोपाल ओझा होते. विशेष निधीतून 26 लाख 83 हजार रुपये खर्च करून सुरत रेल्वे गेट ते राजा ट्रॅक्टर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामास स्थायी समितीने या वेळी मंजुरी दिली. यानंतर शहरातील आगीच्या घटनांसंदर्भातील नोंदी घेण्याचा विषय मंजूर करण्यात आला. विशेष निधीतूनच शहरातील एकूण 15 रस्त्यांच्या कामांना सभेने मंजुरी दिली. या वेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी ठरावीक वॉर्डातीलच कामे न करता या निधीचे सर्व वॉर्डांमध्ये समान वितरण करण्याची मागणी केली. नगरसेवक सुनील माळी यांनी असोदा रस्ता आणि ममुराबाद रस्त्याच्या दुरुस्तीचीही मागणी केली. त्यावर सभापती म्हणाले की, या निधीतून सर्वच वॉर्डात कमी अधिक कामे करण्यात आली आहेत. असोदा आणि ममुराबाद रस्त्याचे काम दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत घेण्यात येणार आहेत.