आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Navchaitanya Class For Police Healt In Jalgaon

तणावग्रस्त पोलिसांत ‘नवचैतन्य’, पोलिसांच्या मानसिक अन् शारीरिक तंदुरुस्तीसाठी खास शिबिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दैनंदिन कामातून मानसिक अन् शारीरिक तणाव घालवण्यासाठी पोलिसांकरिता वर्षभरातून एकदा चैतन्य कोर्स घेतला जातो. मात्र, यावर्षी या कोर्सला नवचैतन्य असे नाव देण्यात आले. नावाप्रमाणेच कोर्समध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संपूर्ण १५ दिवस पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यातून चांगले बदल घडवून आणले. यंदा ते १५ एप्रिलदरम्यान पहिल्या बॅचला पोलिस मुख्यालयातील कवायत मैदानावर प्रशिक्षण देण्यात आले. बदललेल्या नियोजनात एक दिवसाची सहल, प्रोफेशनल डॉक्टर्स, वकिलांकडून मार्गदर्शन योगासने यासारखे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले.
आधी या कोर्सला पोलिस कर्मचारी केवळ औपचारिकता म्हणून यायचे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी कोर्सची रुपरेषा बदलवली. कोर्समधून बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मनापासून चैतन्य निर्माण होण्यासाठी यात चांगले बदल करण्यात आले.

तणावातून थोडी उसंत मिळाली पाहिजे

पोलिसांच्या दैनंदिनीत एकसारखेपणा असतो. त्यामुळे त्यांचा ताण वाढतो. या ताणातून थोडी उसंत मिळावे, नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत म्हणून कोर्समध्ये बदल केला आहे. डॉ.जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक

पहिल्यांदाच सहल

यंदा सुरू झालेल्या पहिल्याच बॅचमध्ये एकूण ७१ पोलिस कर्मचारी बोलावण्यात आले होते. हे सर्व कर्मचारी १५ दिवस हजर होते. एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त या बॅचची पद्मालय येथे सहल नेण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे सहलीला जाण्याचा हा योग पहिल्यांदाच घडून आला. या पुढील बॅचसाठीही सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
मानसिकतणाव वाढल्यामुळे पोलिसांचे आयुष्य तणावात जाते. त्यासाठी यंदा मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी यांना मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. याशिवाय योगा शिकवण्यासाठी डॉ.हेमांगी सोनवणे यांना बोलावण्यात आले होते. व्यसनमुक्ती, फायनान्शियल मॅनेजमेंट, इन्व्हेस्टिगेशन प्रोसिजर, सायबर क्राइम, साॅफ्ट स्किल, टाइम अॅण्ड टीम बिल्डींग मॅनेजमेंट, एसडीआर, सीडीआर अनॅलिसीसवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.

वैद्यकीय तपासणी, गुन्हे तपासाचे कौशल्य

बदललेल्या कोर्समध्ये सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शारीरिक पातळीवर व्याधिग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित औषधोपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुन्ह्यांच्या तपासात सारखेपणा येत असल्यामुळे पद्धतीत सुधारणा झाल्या पाहिजे म्हणून यंदा तपासातील अॅडव्हान्स तंत्र शिकवण्यात आले. यासाठी इतर पोलिस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे.