आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लळिंग कुरणात खास वाहनांतून सफर; रात्री करता येणार मुक्काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - पर्यटकांसाठी आकर्षण असणाऱ्या लळिंग कुरणाची सफर लवकरच आनंददायी होणार आहे. कुरणात असलेल्या लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी रात्रीच्या मुक्कामाची सोय करण्यात येणार आहे. तसेच दाट जंगलाची विशेष वाहनातून सफर घडवण्यात येणार आहे. हे सर्व वननियमांच्या अधीन राहून होणार असून, त्यासाठी सुमारे ५० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन वनविभाग त्यासाठी प्रयत्नशील असून, या उपक्रमासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर शहराला लागून असलेल्या लळिंग कुरणाला वनपर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला जात आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे ५० हेक्टर जागेची निवड केली आहे. या ठिकाणी राहुट्या अर्थात तंबू टाकून वनपर्यटकांसाठी रात्रीच्या मुक्कामाची सोय केली जाणार आहे. याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राहुट्यांच्या सभोवताली उंच काटेरी कुंपण बांधण्यासह इतर मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याचाही प्रशासनाचा विचार आहे. त्याचबरोबर पर्यटकांना लळिंग कुरणाची सफर घडवण्यासाठी जिप्सी वाहने घेणे विचाराधीन आहे. वन्यप्राण्यांना सुरक्षित अंतर ठेवून पाहता यावे यासाठी काही स्पॉटही विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. लळिंगची सफर आणि तिचा आनंदच नव्हे, तर या भागातील दोन टेकड्यांमधून राेपवे रॅपलिंगचा थरारक अनुभवही घेता येणार आहे. पर्यटन विकासांतर्गत लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी कोरड्या पडलेल्या तलावाचे कामदेखील केले जाणार आहे. या तलावातील गाळ काढून त्याची क्षमता वाढवली जाणार आहे. तसेच पावसाळ्यात किल्ला डोंगर-टेकड्यांवरील पाणी तलावापर्यंत पोहाेचण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.
तलावाजवळ विहीर खोदून त्यातील पाणी पर्यटकांच्या तंबूपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. सद्य:स्थितीत या कुरणात वारली चित्रे रेखाटलेल्या झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत. शिवाय बटरफ्लाय गार्डनही विकसित केले जात आहे. अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि या विकास कामांमुळे भविष्यात लळिंगच्या वनपर्यटनाला चालना मिळणार आहे.

५० हेक्टर जागेची किल्ल्याच्या पायथ्याशी निवड

बटरफ्लाय गार्डनचे कामही सुरू
लळिंग कुरणात सद्य:स्थितीत बटरफ्लाय गार्डन अर्थात फुलपाखरांचे उद्यान तयार होत आहे. या ठिकाणी विविध जातीच्या फुलपाखरांसाठी फुलांची राेपे लता-वेलींच्या राेपांची लागवड केली जात आहे. तसेच पर्यटकांना वनभोजन घेता यावे म्हणून आदिवासी बांधव, त्यांची संस्कृती वारली चित्रकला रेखाटलेल्या झोपड्या तयार केल्या जात आहेत.

सकारात्मक प्रयत्न
लळिंगकुरणात वन पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कामाला सुरुवात झाली आहे. कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल. -एस.जी.हलमारे, उप वनसंरक्षक,धुळे

जल-जंगलाचे संवर्धन करून करणार विकास
लळिंग कुरणातील टेकड्यांवर सलग समांतर (सीसीटी) चर खोदण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. पावसाळ्यात डोंगर-टेकड्यांवरील पाणी थेट तलावपर्यंत नेऊन भूजलसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न होतील. त्यामुळे लळिंग कुरणातील लांडोर बंगल्याजवळील अन्वर नाल्यावरील धबधबा वाहता होण्यास मदत होणार आहे.

तर खासगी कंपनीला ठेका
पर्यटकांनाजंगलात नेण्यासाठी अभयारण्यात दिसणाऱ्या वाहनांचा उपयोग केला जाऊ शकतो. ही वाहने शासन खरेदी करून वनविभागाच्या स्वाधीन करणार आहे अथवा अटी-शर्तींनुसार ठेकेदार नेमला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपलब्ध निधी, खर्च, देखभाल-दुरुस्ती मनुष्यबळाचा विचार करता ठेका देण्याकडे प्रशासनाचा कल असल्याची माहिती देण्यात आली.

शिल्पांची होणार उभारणी
पर्यटकांनालळिंग किल्ला, कुरण, लांडोर बंगल्यासह लळिंग वनहद्दीत असलेले वृक्ष वन्यजीवांच्या माहिती मिळावी यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय काही ठिकाणी दगडी शिल्पेही उभारली जाणार आहेत. वनपर्यटनातून शासनाला महसूल प्राप्त करून देण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती देण्यात आली.