आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध धंदे उद‌्ध्वस्त करण्यासाठी विशेष पथक नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी तीन उपअधीक्षकांचा समावेश असलेले विशेष पथक नियुक्त केले आहे. सध्या भुसावळ शहर परिसर या पथकाच्या रडारवर आहे.

अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या या पथकात सदाशिव वाघमारे, सुरेश गुरव, सागर कवडे या तीन उपअधीक्षकांचा समावेश असून तिन्ही अधिकारी नव्या दमाचे आहेत. त्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थात एप्रिल राेजी भुसावळातील हद्दिवाली चाळ भागात जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगा-यांना पकडले. गुप्त माहितीच्या आधारावर सट्टा, जुगाराचे अड्डे, अवैध दारू राॅकेल विक्री अशा अवैध धंद्यांविराेधात ही कारवाईची माेहीम उघडण्यात आली आहे. भुसावळसह फैजपूर, चाळीसगाव विभागातही हेे पथक कारवाई करणार आहे.
जिल्ह्यातील सर्वच उपअधीक्षक, निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे चालवणा-यांच्या मुसक्या बांधण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षकांनी दिले आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांत भुसावळात एकाही जुगाराच्या अड्ड्यावर माेठी कारवाई झालेली नव्हती, मात्र बुधवारी विशेष पथकाने कारवाई केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

स्थानिक यंत्रणेवरचा विश्वास कमी
अधीक्षकांनीनियुक्त केलेल्या पथकाने हद्दिवाली चाळ भागातील जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केल्याने भुसावळ शहर पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. बाजारपेठ हद्दीचीही अशीच अवस्था आहे. दाेन आठवड्यांपूर्वी भर चाैकातून व्यापा-याची लूट करून पसार झालेले आराेपी अद्यापही पाेलिसांना गवसलेले नाहीत, म्हणून जनतेचा स्थानिक पाेलिसांवरील विश्वास उडाला असून नाराजी वाढली आहे.

वर्दळीच्या रस्त्यांवरच सट्टाबेटींग
हद्दिवालीचाळ, जुना सतारे, जळगाव राेड, जामनेर राेड, खडका राेड, जाम माेहल्ला, पंधरा बंगला या भागांत माेठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. लाॅटरीच्या नावाखाली तर सर्रास सट्टा बेटिंग सुरू असल्याची आेरड आहे. सामाजिक संघटनांनी अनेकवेळा अवैध धंद्यांसंदर्भात आवाज उठवला. मात्र, स्थानिक पाेलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.खडकाराेडसह जाम माेहल्ल्यात सर्रास जुगारांचे अड्डे सुरू आहेत. मात्र, ते चालवणारे म्हाेरके राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने कारवाईच हाेत नाही.