आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Special Story Of Norway And Sweden Experience By Sangeeta Ghodgaonkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...म्हणून नॉर्वे, स्वीडनमधील नागरिकांचे आयुर्मान वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डेन्मार्क येथे सहकाऱ्यांसोबत संगीता घोडगावकर.)
इनरव्हीलच्या १६व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने फक्त महिलांच्या चमूबरोबर कोपेनहेगन (डेन्मार्क) त्याचबरोबर नॉर्वे, स्वीडनला जाण्याचा योग आला. तेथील उच्च राहणीमान, उत्तम शैक्षणिक संस्था, चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा या शहरातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ८० वर्षांवर पोहोचवण्यास कारणीभूत आहेत. पर्वतरांगा, समुद्र पर्यटन, विविध प्रकारची फुले, हिरवळ आल्हाददायक वातावरण ही या प्रवासाची वैशिष्ट्ये ठरतात.
छोट्याशा कोपेनहेगनच्या विमानतळावर उतरले आणि बाहेर आले, तर वेगळीच अनुभूती झाली. खूप ताजेतवाने वाटले. कारण तेथील शुद्ध हवा, शिस्तबद्ध नागरिकांमुळे आणि आपल्या हरित उद्यानांसाठी प्रसिद्ध असलेली डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनचे रस्ते परिसर अतिशय स्वच्छ होते. खासकरून बनवलेले सायकलींसाठीचे मार्ग वापरण्यावरच नागरिकांचा अधिक भर होता. तसेच राजधानीत कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा अधिक वापर होत होता. ऐतिहासिक वारसा असणारे हे शहर आपल्या उच्च जीवनमूल्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. डेन्मार्कच्या राणीचे घर असलेले शहर अॅमलिनबर्ग आपल्या राजवाडा, पुरातन कलाकुसर, कलादालने, संग्रहालयांमुळे अधिकच वैशिष्ट्यपूर्ण वाटते. जुने रस्ते, कालव्यातील बोटीतील प्रवास अविस्मरणीय होता.
कोपेनहेगन ते ओसलोचा समुद्र मार्गावरील प्रवास एक वेगळाच अनुभव होता. ओसलो शहरातील ग्रँट हॉल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे; ज्यामध्ये नोबेल पारितोषिक वितरण समारंभदेखील समाविष्ट आहे. ओसलो शहराचे सौंदर्य प्राचिन कलाकृती अनेक पटींनी वाढवतात.
या शहरातील कलेचा खजिना अप्रतिम आहे. २००पेक्षा अधिक कांस्य, ग्रेनाइट तत्सम खनिजांपासून बनवलेल्या कलाकृतींनी नटलेले विजलँड स्कल्पचर पार्क एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. यातील लहान रागावलेल्या मुलाचा पुतळा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. माणुसकीचा संदेश देणारे हे एक पाहण्यायोग्य पर्यटनस्थळ आहे. ओसलाे शहरालगतच हिवाळी खेळांसाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण आहे.
ओसलोपासून ते बरगन बसचा प्रवास एक रोमांचक अनुभव होता. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा एक अद््भूत परिसर आहे. या प्रवासादरम्यान धबधबे, बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिरवळीचे प्रदेश या परिसराला अधिकच मनमोहक करतात. उत्तर युरोपातील सर्वात लांब बोगदा म्हणजे लेरडल टनल, फिओर्डचा नयनरम्य नजारा अविस्मरणीय आहे. स्टॉकहोम आपल्या राजमहल संग्रहालयासाठी प्रसिद्ध आहे. स्टॉकहोम शहर १४ बेटांपासून बनलेले आहे. स्टॉकहोम शहर हे बॅलटिक सागराच्या किनारी वसलेले आहे. स्टॉकहोम शहराला उत्तरेचे व्हेनिससुद्धा म्हटले जाते. कारण तेथील बोटी जलमार्गाने ५० पुलांखालून मार्ग काढत नागरिकांना या ठिकाणावरून त्या ठिकाणावर पोहोचवतात. स्टॉकहोम शहरातील सिटी हॉल एक महत्त्वपूर्ण वास्तू आहे. ड्रॉटिनंगहोममध्ये आपणास जागतिकदर्जाचे ऐतिहासिक सौंदर्य पाहावयास मिळते. तत्पर दळणवळण सुविधा आपला प्रवास अधिकच सुखकर करतात. सायकलींसाठी वेगळा मार्गदेखील येथे पाहावयास मिळतो.
पश्चिम युरोपातील स्कॅन्डीनाविआ एक अतिशय प्रसिद्ध प्रगत प्रांत आहे. येथील शांत, थंड आल्हाददायक वातावरण एक वेगळाच अनुभव देऊन जाते. विविध प्रकारचे पुष्पसौंदर्यदेखील मन मोहवून जाते.
-संगीता घोडगावकर