आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष: या गुंडांच्या मुसक्या कधी आवळणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘इलाज करण्यापेक्षा दक्षता घेणं अधिक चांगलं,’ अशा अर्थाची सर्वज्ञात इंग्रजी म्हण जळगाव पोलिसांना माहिती आहे की नाही, असा प्रश्‍न सोमवारपासून शहरात सुरू असलेल्या ‘गुंडाराज’ने निर्माण केला आहे. सलग चार दिवसांपासून विशिष्ट मंडळी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे आणि पोलिस यंत्रणा साप गेल्यावर भुई थोपटते आहे. गुंडगिरी आणि दहशतीच्या माध्यमातून सत्तेच्या पायर्‍या चढू इच्छीणार्‍यांना वेळीच लगाम घालण्याची, त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज असताना बोटचेपी भूमिका पोलिस यंत्रणेकडून घेतली जात आहे.

सलग चार दिवसांपासून घडत असलेल्या घटनांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांची आणि त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची नावे अग्रक्रमाने येत आहेत. समाजवादी पक्षाचाही सहभाग ठळकपणे जाणवतो आहे. शहरातील विशिष्ट धर्माच्या मतांसाठी सुरू असलेली ही लढाई आहे हे लपून राहिलेले नाही. निवडून येण्यासाठी काय अजेंडा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे; पण तो अजेंडा सर्वसामान्यांच्या गळय़ाशी येत असेल तर वेळीच पायबंद घातला गेला पाहिजे. काही राजकारणी मंडळी या निवडणुकीच्या निमित्ताने आपली जुनी दुखणी काढताना दिसताहेत. काहींना ‘आता असेच होणार’ हे दाखवून देण्याची संधी त्या माध्यमातून मिळते आहे. हे सारे सर्वसामान्य जळगावकर समजत असताना पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकार्‍यांना ते उमजत नसावे, यावर विश्वास तरी कसा ठेवणार? तरीही पायबंद घातला जात नसेल तर मात्र यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या हातातले बाहुले तर झाली नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

अजूनही वेळ गेलेली नाही. निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांची गुंडगिरीची खुमखुमी उफाळून आली आहे त्यांना वेळीच वेसण घालण्याची आवश्यकता आहे. काही अघटित घडण्यापूर्वी सत्ता, जात, धर्म आणि पैसा यांची शस्त्रे बनवून दहशत माजवत फिरणार्‍यांच्या पायात कायद्याच्या बेड्या अडकवल्या पाहिजेत. त्या आधी त्यांना शेवटचा इशारा देण्याची गरज आहे. प्रशासकीय, विशेषत: पोलिस यंत्रणेने विशिष्ट पक्ष आणि नेत्यांच्या हातातले बाहुले बनून काम करण्यापेक्षा आपल्या पदसिद्ध कर्तव्याला जागून सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे आणि कठोरपणे पार पाडली पाहिजे. त्यासाठी आता थोडाही वेळ वाया घालवणे परवडणारे नाही.